विधान भवनातून : एकनाथ शिंदे यांची फटकेबाजी ! | पुढारी

विधान भवनातून : एकनाथ शिंदे यांची फटकेबाजी !

उदय तानपाठक : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे खरे तर चांगले वक्ते कधीच नव्हते. तोंड बंद ठेवून काम करत राहण्याचा वसा त्यांना आनंद दिघे यांच्याकडून मिळाला. मुख्यमंत्री झाल्यानंतर आता यांचे कसे होणार, अशी चर्चा होऊ लागली होती. मात्र, त्यांनी विधानसभेत ते ऐतिहासिक भाषण केले तेव्हा एकनाथ शिंदे हे दिसतात तसे नाहीत याची जाणीव झाली. त्यांनी त्या भाषणात सर्वांच्याच सफाईदारपणे टोप्या उडवल्या होत्या. आजही त्यांनी राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेला उत्तर देताना आपल्यातला कसलेला राजकारणी दाखवून दिला. त्यांच्या चौफेर फटकेबाजीने विरोधकांना नाकी नऊ आणले. प्रेमाने खडे बोल ऐकवताना त्यांनी आपल्यावरील आणि सरकारवरील आरोपांना उत्तर दिले. उद्धव ठाकरे यांचे नावही न घेता त्यांनी अक्षरशः त्यांच्या कारभाराने वाभाडे काढले. एकनाथ शिंदे यांच्या भाषणाला सत्ताधारी आमदारांकडून हशा- टाळ्यांची दाद मिळाली, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही या कल्लोळात सामील झाले होते. विरोधकांनी शिंदे यांच्या भाषणात गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला; परंतु त्याला न जुमानता शिंदे यांनी फटकेबाजी सुरूच ठेवली.

मुख्यमंत्र्यांचे लक्ष होते ते विरोधी पक्षनेते अजित पवार आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील! महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री म्हणून नुकतेच राष्ट्रवादीच्या कार्यालयाबाहेर बॅनर लागले होते. जयंत पाटील, अजित पवार आणि सुप्रिया सुळे या तिन्ही नेत्यांचा उल्लेख भावी मुख्यमंत्री, असा करून सलग तीन दिवस हे बॅनर्स लागले होते. आज मुख्यमंत्र्यांनी याचा उल्लेख करून जयंतराव आणि अजित पवार तुमच्यापैकी नक्की कोण भावी हे ठरवा, असा टोला लगावला. त्यांच्या या टोल्यावर एकच हशा पिकला.

उद्धव ठाकरे यांना टोला

मुख्यमंत्र्यांच्या ‘वर्षा’ बंगल्यावरच्या चहापाण्याचा खर्च २ कोटी ४० लाख झाल्याचा आरोप विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केला होता. मुख्यमंत्र्यांनी त्यावरून माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता टोला लगावला. ‘वर्षा’ बंगला गेली अडीच वर्षे सामान्य जनतेसाठी बंद होता, तरीही तिथली चहापाण्याची बिले निघाली का, याची माहिती घ्या. प्रत्यक्षात फेसबुक लाईव्ह सुरू होते. शिवाय, कोरोना चाचणी केल्याखेरीज कुणालाही ‘वर्षा’वर प्रवेश नव्हता, असे शिंदे यांनी सुनावले. राज्यभरातून आमच्याकडे मोठ्या प्रमाणावर लोक येतात. या सोन्यासारख्या जनतेला किमान चहापाणी करणे ही आपली संस्कृतीच नाही काय, असा सवाल शिंदे यांनी केला. हे सरकार जाहिरातीवर अफाट खर्च करीत असल्याच्या टीकेला उत्तर देताना गेल्या सरकारने पीआरसाठी २५० कोटी देऊन एजन्सी नेमली होती, अजित पवारांच्या वैयक्तिक पीआरसाठी ६ कोटींचे कंत्राट देण्याचा घाट घातला गेला; मात्र टीका झाल्यावर तो रद्द करण्यात आला, असे शिंदे म्हणाले.

आपल्या सरकारने केलेल्या कामाची जाहिरात करताना ‘सामना’लाही जाहिराती दिल्या, ‘सकाळ’लाही दिल्या आहेत. सरकार घटनाबाह्य असल्याचे म्हणता; मग या घटनाबाह्य सरकारची कामे कशासाठी जाहिरातीद्वारे छापता? असा खोचक सवाल त्यांनी केला. कसब्यातील विजयाबद्दल काँग्रेसचे तोंड भारून कौतुक करणाऱ्यांना ‘बेगानी शादी में अब्दुल्ला दिवाना’ असेच म्हणावे लागेल, असाही टोला शिंदे यांनी उद्धव यांना लगावला. दाव्होसच्या फोरमला गेल्या सरकारमधले मंत्री कुटुंबकबिल्यासह गेले होते, त्यांनी किती खर्च केला, याचीही माहिती आपल्याकडे आहे. तेव्हा महाराष्ट्राच्या पॅव्हेलियनमध्ये खुर्च्याही दुसऱ्याकडून मागून आणाव्या लागल्या होत्या, हे मुख्यमंत्री शिंदे यांनी उघड केले. एकूण एकनाथ शिंदे यांनी आज केलेले भाषण म्हणजे तयार राजकारण्याची खेळी होती, असेच म्हणावे लागेल.

Back to top button