पुढारी ऑनलाईन डेस्क : खासदार संजय राऊत यांच्या विरोधात आज (दि. १ मार्च) विधीमंडळ हक्कभंग समितीची स्थापन करण्यात आली आहे. एकूण १५ जणांचा या समितीमध्ये समावेश असल्याची प्राथमिक माहिती आहे. त्यामुळे आता संजय राऊत यांच्या अडचणींमध्ये वाढ होण्याची दाट शक्यता वर्तविली जात आहे.
आमदार राहुल कुल हे या समितीचे प्रमुख असतील. तसेच नितेश राणे, अतुल भातळखर, संजय शिरसाट, सदा सरवणकर, अमित साटम, सुनिल केदार, योगेश सागर नेत्यांचाही या समितीमध्ये समावेश असल्याचे सांगितले जात आहे.
खासदार संजय राऊत यांनी 'महाराष्ट्रात विधीमंडळ हे तर 'चोर' मंडळ' असं वक्तव्य केलं होतं. पण या वक्तव्याने त्यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. भाजपने या वक्तव्याची गंभीर दखल घेत राऊतांविरोधात विधिमंडळ सभागृहात हक्कभंग प्रस्ताव दाखल केला आहे. या प्रकरणी अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी संजय राऊत यांनी केलेल्या वक्तव्याची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. दोन दिवसांत ही चौकशी पूर्ण करावी, असे आदेश त्यांनी दिले आहेत. त्यामुळे संजय राऊत यांच्याविरोधातील हक्कभंगाच्या नोटीसवर ८ मार्च रोजी राहुल नार्वेकर निर्णय देणार आहेत.
दरम्यान, या वादग्रस्त विधानावर भाजपने आज (दि. १ मार्च) विधीमंडळ अधिवेशनात प्रश्न उपस्थित केले. तसेच संजय राऊत यांच्यावर हक्कभंगाची मागणी करण्यात आली. या मागणीनंतर आता विधीमंडळ हक्कभंग समितीची स्थापन करण्यात आली आहे. ही समिती संजय राऊत यांच्या विधानासंदर्भात तपास करुन त्यांच्या वक्तव्याशी संबंधित नोटीस पाठवेल अशी शक्यता वर्तविली जात आहे.
हेही वाचा