मुंबई : संजय राऊत यांच्या वक्तव्यावरून कामकाज तीनवेळा तहकूब; विरोधकांनी मांडला हक्‍कभंग | पुढारी

मुंबई : संजय राऊत यांच्या वक्तव्यावरून कामकाज तीनवेळा तहकूब; विरोधकांनी मांडला हक्‍कभंग

मुंबई : पुढारी वृत्तसेवा खासदार संजय राऊत यांनी विधानमंडळाला चोरमंडळ म्हटल्याच्या कारणावरून सत्ताधाऱ्यांनी राऊत यांच्या विरोधात हक्कभंग मान्य करण्यासाठी विधानसभेत जोरदार गदारोळ केला. या गदारोळमुळे विधानसभेचे कामकाज तीनवेळा तहकूब करण्यात आले आहे. विशेष म्हणजे विरोधी पक्षनेते अजित पवार आणि काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात यांनीही संजय राऊत यांची वक्तव्य तपासून कारवाई करण्याची भूमिका घेतली.

विधानसभेचे कामकाज सुरू होताच भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी संजय राऊत यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना विधिमंडळाचा उल्लेख चोरमंडळ केला असल्याचे सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले. याप्रकरणी भाजप सदस्य अतुल भातखळकर यांनी राव त्यांच्या विरोधात हक्कभंगाची नोटीस दिल्याचेही शेलार म्हणाले. सभागृहात बसलेले सदस्य हे महाराष्ट्रातील जनतेचे प्रतिनिधित्व करतात त्यांना चोर म्हणणे हा जनतेचा अपमान आहे. हा या कायदेमंडळाचा देखील अपमान आहे. याप्रकरणी विरोधकांनी स्पष्ट भूमिका घ्यावी. बोटचेपी भूमिका घेऊ नये, असे शेलार यांनी सांगितले.

त्यावर विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी कोणत्याही व्यक्तीला चोरमंडळ म्हणण्याचा अधिकार नाही. पक्षीय मतभेद बाजूला ठेवून अशा वक्तव्याचा गांभीर्याने विचार केला पाहिजे .अभिव्यक्ती स्वातंत्र्य असले म्हणून कोणाला काहीही बोलण्याचा अधिकार नाही. परंतु त्यातले तथ्य तपासले पाहिजे. राऊत यांनी खरोखरच तसे वक्तव्य केले आहे का ते तपासून या प्रकरणी योग्य ती कारवाई करावी अशी भूमिका अजित पवार यांनी घेतली.

काँग्रेसचे विधिमंडळ पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात यांनी विधिमंडळ हे सर्वोच्च सभागृह असून महाराष्ट्रात या सभागृहाला आदराचे स्थान आहे. या विधिमंडळाची थोर परंपरा आहे. त्यामुळे असे वक्तव्य करणे हे चुकीचे आहे, असे सांगितले. त्याचवेळी त्यांचे वक्तव्य तपासण्याची मागणीही थोरात यांनी केली. सत्ताधारी आणि विरोधक अशा दोन्ही बाजूने वक्तव्य करताना शब्द जपून वापरले पाहिजेत. जसे राऊत यांचे वक्तव्य चुकीचे आहे तसे या सभागृहातील सदस्याला देशद्रोही म्हणणेही चुकीचे आहे असेही थोरात यांनी सांगितले. मात्र त्यावर भाजप आणि शिवसेनेचे सदस्य जास्तच आक्रमक झाले.

भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी संजय राऊत यांनी विधिमंडळाबद्दल अनुद्गार काढले आहेत. त्यांनी चोरमंडळ म्हटले आहे आणि त्याची क्लिप माझ्याकडे आहे, असे सांगितले. मुंबईतील कोविड हॉस्पिटलच्या घोटाळ्यात त्यांच्या जवळच्या माणसाला पोलिसांनी अटक केल्यामुळे नैराश्यातून राऊत यांनी असे वक्तव्य केले आहे, अशी टीकाही भातखळकर यांनी केली. शिवसेना प्रतोद भरत गोगावले यांनी तर संजय राऊत यांचा चुकीचा उल्लेख केला. राऊत यांचे आता अती झाले. त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे अशी मागणी केली. शिवसेना आमदार यामिनी जाधव यांनी तर यापूर्वी संजय राऊत यांनी महिला आमदारांना वेश्या असा उल्लेख करूनही कोणी त्याची गंभीर दखल घेतली नाही, अशी नाराजी व्यक्त केली.

यावेळी ठाकरे गटाचे आमदार रवींद्र वायकर यांनी अतुल भातखळकर यांनी हक्कभंगाचे केवळ पत्र दिले असल्याचे सांगत भरत गोगावले यांच्या वक्तव्यावर आक्षेप घेतला. गोगावले जर सभगृहात चुकीच्या शब्दाचा उल्लेख करत असतील तर ते देखील चुकीचे आहे. ते सभागृहाच्या परंपरेला धरून नाही, असे वायकर म्हणाले.

मात्र आक्रमक झालेल्या सत्ताधारी पक्षाच्या आमदारांनी वेलमध्ये येऊन राऊत यांच्या विरोधात घोषणाबाजी करत गदारोळ सुरू केला. राऊत यांच्यावर कारवाई करा, हक्कभंग मान्य करा असा आग्रह त्यांनी अध्यक्षांकडे धरला. त्यामुळे झालेल्या गदारोळात कामकाज तीनवेळा तहकूब करण्यात आले. त्यामुळे प्रश्नोत्तराचा तास होऊ शकला नाही.

हेही वाचा : 

Back to top button