Maharashtra Political Crisis : सत्तासंघर्षावर आजपासून पुन्हा सुनावणी | पुढारी

Maharashtra Political Crisis : सत्तासंघर्षावर आजपासून पुन्हा सुनावणी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था : महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर गेल्या आठवड्यात तीन दिवस सुनावणी झाल्यानंतर घटनापीठासमोर मंगळवारपासून पुन्हा तीन दिवस सुनावणी होणार आहे. ठाकरे गटाचा युक्तिवाद संपला असून आता शिंदे गटाच्या वतीने मंगळवारपासून युक्तिवाद केले जाणार आहेत. मंगळवार, बुधवार आणि गुरुवार असे तीन दिवस या सुनावणीसाठी देण्यात आले आहेत. ठाकरे गटाचे युक्तिवाद खोडून काढताना शिंदे गट काय भूमिका मांडेल याकडे सर्वांचे लक्ष आहे.

गेल्या सुनावणीत काय झाले?

महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षावर २३ फेब्रुवारी रोजी सुनावणी झाली. ठाकरे गटाकडून अभिषेक मनु सिंघवी यांच्याकडून शिंदे गटाला पक्षांतर बंदी कायदा लागू होतो, यावर जोरदार युक्तीवाद करण्यात आला. सिंघवी म्हणाले, शिंदे गटाची कृती ही पक्षाच्या आदेशाची उल्लंघन करणारी आहे. पक्षांतर बंदी कायद्याच्या दोन्ही कलमांतर्गत शिंदे यांच्या कृतीला हा कायदा लागू होतो. 2 1 A या कलमांतर्गत पक्षांतर बंदी कायदा सरळसरळ लागू होतो, असे सिंघवी यांनी म्हटले आहे. यासाठी त्यांनी राजेंद्र सिंह यांच्या प्रकरणाचा हवाला दिला. तसेच घडलेला घटनाक्रम पुन्हा एकदा सांगितला. तसेच महाराष्ट्रात घडलेल्या या घटना दूर्मीळ आहेत. शिंदे गटाकडून दहाव्या सूचीचं उल्लंघन करण्यात आले आहे, असा युक्तीवाद सिंघवी यांनी केला आहे.

शिंदे गटाचा बचाव अशक्य

शिंदे यांच्या कृतींमधून त्यांनी पक्षाच्या व्हीपचे उल्लंघन केले आहे. हे स्पष्ट दिसून येते, असे म्हणत शिंदे आणि त्यांच्या गटाचा बचाव अशक्य आहे. घडलेल्या घटना खोट्या आहेत असा दावा शिंदे यांनी केला तर आणि तरच त्यांचा बचाव होऊ शकतो. अन्यथा त्यांच्या कृतीअनुसार पक्षांतर बंदीचा कायदा त्यांना लागू होतो. विशेष म्हणजे कायद्याच्या दोन्ही कलमांतर्गत त्यांना हा कायदा लागू होतो, असा जोरदार युक्तीवाद अभिषेक मनु सिंघव यांनी केला आहे.

Back to top button