एसटीच्या ताफ्यात लवकरच येणार साडेतीन हजार नवीन गाड्या | पुढारी

एसटीच्या ताफ्यात लवकरच येणार साडेतीन हजार नवीन गाड्या

मुंबई : सुरेखा चोपडे : एसटी महामंडळाच्या ताफ्यात येत्या वर्षभरात साडे तीन हजार नविन एसटी दाखल होणार आहेत. यात स्लीपर (शयनयान), निमआराम, रातराणी, इलेक्ट्रिक बसचा समावेश आहे. यामुळे राज्यातील नागरिकांचा प्रवास अधिक आरामदायी आणि सुरक्षित होणार आहे.

महामंडळाच्या ताफ्यातील १५ हजार पैकी सात हजार एसटी भंगारात जाणार आहेत. त्यातच वर्ष २०१६ ते २०१९मध्ये नवीन गाड्या न घेता केवळ वापरातील तनीकरण करण्यावर महामंडळाने भर दिला. त्यामुळे खडखडाट झालेल्या, मोडकळीस आलेल्या एसटीतून प्रवाशांना प्रवास करावा लागतो. परिणामी, प्रवासी एसटीकडे वळत नाहीत. प्रवासी संख्या वाढविण्यासाठी महामंडळाने आता नवीन एसटी ताफ्यात समाविष्ट करण्याची योजना आखली आहे.

वर्ष २०२२-२३ मध्ये महामंडळाने ७०० चासिस खरेदी केल्या असून एसटीच्या तीन मध्यवर्ती कार्यशाळेमध्ये त्यापैकी ४५० साध्या बस बांधण्याचे काम सुरू आहे. फेब्रुवारी अखेर ८० बस वेगवेगळ्या आगाराला देण्यात येणार आहेत. तसेच ५० शयनयान बस व २०० निम आराम बस बांधण्याचे काम बाह्य संस्थेला दिले आहे. पर्यावरण पूरक बीएस-६ डिझेल इंजिनवर चालणाऱ्या साध्या दोन हजार बस तयार करण्यासाठी चासिस (सांगाडा) खरेदी प्रक्रिया सुरू केली असून त्या बस लवकरच महामंडळाच्या ताफ्यात समाविष्ट होतील.
याव्यतिरिक्त ५०० साध्या नवीन बस भाडेतत्त्वावर घेण्यात आल्या असून त्या कोल्हापूर, सांगली, पुणे, लातूर, रायगड, रत्नागिरी विभागात वितरित केल्या आहेत. तसेच १०० इलेक्ट्रक बस लवकरच एसटीच्या ताफ्यात दाखल होत आहेत.

५०० साध्या बस

महामंडळ प्रथम ५०० बसची बांधणी करणार आहे. या बसमध्ये ३३ पुशबॅक आसने आहेत. दोन आसनांतील अंतर इतर बसच्या तुलनेत जास्त असल्याने प्रवाशांना आरामात बसता येणार आहे.

५० स्लीपर बस

महामंडळाने स्लीपर प्रकारातील ५० बस ताफ्यात दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी निविदा प्रक्रियाही राबविली असून बससाठी लागणारा सांगाडा टाटा कंपनीकडून घेउन महामंडळ त्याची बांधणी करणार आहे..

मार्चपर्यंत २०० नवीन हिरकणी

प्रवाशांच्या सेवेत मार्च २०२३ पर्यत २०० नविन हिरकणी बस येणार आहेत. या बसमध्ये प्रवाशांमध्ये पुश बॅक आसन व्यवस्थाही असणार आहे. सध्या एसटीच्या ताफ्यात ४०० हिरकणी बस आहेत. त्यापैकी २०० बसचे आयुर्मान संपल्याने या बसचे रुपांतर साध्या बसमध्ये करण्यात येणार आहे. परिणामी फक्त २०० हिरकणी बस महामंडळाच्या ताफ्यात राहणार आहेत. त्यामुळे महामंडळाने नविन हिरकणी बस ताफ्यात आणण्याचा निर्णय घेतला आहे.

बस खरेदीपेक्षा भाडेतत्त्वावर भर

गाड्या खरेदी करण्यापेक्षा त्या भाडेतत्वावर घेण्याचा एसटी महामंडळाने निर्णय घेतला आहे. २०२२-२३ मध्ये स्वमालकीच्या १५ हजार ३२० एसटी आहेत. तर भाडेतत्वावरील गाड्या १९२ आहेत. वर्ष २०२६-२७ मध्ये स्वमालकीच्या १२ हजार ८८० आणि भाडेतत्वावरील सात हजार गाड्या असतील. या सात हजार बसमध्ये ईलेक्ट्रिक, सीएनजी, डिझेल- वरील बसचा समावेश असेल. तसेच ९०० एसी ईलेक्ट्रिक मिडी देखील येणार आहेत.

Back to top button