मंत्रिमंडळ विस्ताराच्या आधीच राज्यातील सरकार कोसळणार : आदित्य ठाकरे | पुढारी

मंत्रिमंडळ विस्ताराच्या आधीच राज्यातील सरकार कोसळणार : आदित्य ठाकरे

मुंबई, पुढारी वृत्तसेवा : विविध राज्यांचे मुख्यमंत्री मुंबईत येतात आणि आपल्या राज्यांसाठी गुंतवणूक, उद्योग मिळवितात; पण आपल्या राज्याचे मुख्यमंत्री मात्र फक्त दिल्लीत जातात. स्वतःच्या मंत्रिमंडळाच्या विस्ताराची परवानगी मागण्यासाठी हे दिल्लीत जातात; पण लिहून घ्या तुमच्या मंत्रिमंडळाचा विस्तार होणार नाही. कारण, विस्ताराच्या आधीच हे सरकार कोसळणार आहे, असा दावा शिवसेना (ठाकरे गट) नेते आ. आदित्य ठाकरे यांनी रविवारी केला.

वरळी येथील जांभोरी मैदानात ठाकरे गटाचा निर्धार मेळावा पार पडला. यावेळी खा. अरविंद सावंत, आ. भास्कर जाधव, सचिन अहिर, सुनील शिंदे, सुषमा अंधारे, किशोरी पेडणेकर आदी नेते उपस्थित होते. ठाकरे गटाच्या निर्धार मेळाव्यात आदित्य ठाकरे यांनी राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. राज्यातील शिंदे-फडणवीस सरकार हे अल्पायुषी आहे.

शिंदे गट आणि भाजपातच आता वाद सुरू झाले आहेत. भाजपाने या गटाचा केवळ वापर केला आहे. त्यांनी त्यांचा शेवटचा वापर आपले चिन्ह आणि पक्ष लाटण्यासाठी केला होता. त्यामुळे आता त्यांचा वापर संपल्याने संघर्ष सुरू झाला आहे. शिवसेनेतून हे 40 आमदार बाहेर पडले तेव्हाच त्यांनी राजकीय आयुष्याची ‘व्हीआरएस’ घेतली होती, असे आदित्य म्हणाले.

शिवसेनेतून फुटल्यापासून गद्दारीची वेगवेगळी कारणे या आमदारांनी सांगितली; पण त्यातल्या चार मंत्र्यांनी त्यांची विविध ठिकाणी असलेली खाती आणि त्यामुळे आलेल्या दबावाचे कारण आम्हाला स्पष्टपणे बोलून दाखविले होते. त्यामुळे आम्हाला बोलायला लावू नका; अन्यथा फिरणे मुश्कील होईल, असेही ठाकरे म्हणाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधातील भ्रष्टाचाराची प्रकरणे बाहेर काढण्यामागे भाजपाच असल्याचा पुनरुच्चारही आदित्य ठाकरे यांनी यावेळी केला.

Back to top button