सोन्याऐवजी दिली व्हील साबणाची वडी; स्वस्तात सोने देण्याच्या आमिषाने गंडा | पुढारी

सोन्याऐवजी दिली व्हील साबणाची वडी; स्वस्तात सोने देण्याच्या आमिषाने गंडा

मुंबई : पुढारी वृत्तसेवा : स्वस्तात सोने देण्याचे आमिष दाखवून एका २४ वर्षांच्या तरुणाची फसवणूक करुन पळून गेलेल्या एका त्रिकुटाला साकिनाका पोलिसांनी अटक केली. त्यात एका महिलेचा समावेश असून या टोळीने सोनेऐवजी व्हिल साबणाची वडी देऊन पलायन केले होते, अखेर दहा दिवसांत तिन्ही आरोपींना अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. मोहम्मद उबेदुल्ला मुद्दसीर शेख, सायराबानो मोहम्मद समीर शेख आणि हबीब हमजा कुरेशी या तिघांची नावे आहेत. तिघांना स्थानिक न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे.

१२ फेब्रुवारीला मुकेश हरिश्चंद्र कुमार या तरुणाला एका महिलेसह दोघांनी स्वस्तात सोने देते असे सांगून त्याच्याकडून दोन लाख रुपये घेतले. त्यानंतर सोनेऐवजी व्हिल साबणाची वडी देऊन ते दोघेही पळून गेले होते. मुकेशने साकिनाका पोलिसांत तक्रार केली होती. फसवणुकीचा गुन्हा नोंद होताच पळून गेलेल्या आरोपींचा पोलिसांनी शोध सुरु केला होता.

बळवंत देशमुख यांच्या पथकातील सपना क्षीरसागर, राजेंद्र नागरे, चंद्रकांत पवार, दिपक निकम, दिपक निकाळजे, अय्याज शेख, अनिल कारंडे यांनी वेगवेगळ्या परिसरातून मोहम्मद उबेदुल्ला, सायराबानो आणि हबीब या तिघांना अटक केली. यातील उबेदुल्ला हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्याविरुद्ध यापूर्वीचे सात गुन्हे दाखल आहेत. मोहम्मद उबेदुल्ला हा कोलकाता, सायराबानो राजस्थान तर हबीब नवी मुंबईच्या तुर्भेचा रहिवाशी असल्याचे पोलिसांनी सांगितले. ही टोळी स्वस्तात सोने देऊन अनेकांना गंडा घालत होती.

Back to top button