मध्यावधीची शक्यता नाही : शरद पवार | पुढारी

मध्यावधीची शक्यता नाही : शरद पवार

मुंबई, पुढारी वृत्तसेवा : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासह विविध पक्षांच्या नेत्यांनी राज्यात मध्यावधी निवडणुकीची शक्यता वर्तवली असली, तरी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मध्यावधीची शक्यता नसल्याचे म्हटले आहे.

राज्यातील सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयात खल सुरू असून, मंत्रिमंडळाचा विस्तार लांबत चालला आहे. या पार्श्वभूमीवर प्रसारमाध्यमांनी पवार यांना विचारले असता सध्या तरी अशी चिन्हे नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. इतर पक्षाचे नेते मध्यावधी होणार असल्याचे कोणत्या आधारावर बोलत आहेत, हे आपल्याला माहीत नाही, असेही पवार म्हणाले.

लोकसेवा आयोगाचा नवीन अभ्यासक्रम 2025 पासून लागू करण्याबाबत पवार यांनी मध्यस्थी केल्याबद्दल एमपीएससीच्या विद्यार्थ्यांनी मुंबईत त्यांची भेट घेऊन आभार मानले. त्याप्रसंगी बोलताना पवार यांनी भाजपवर टीका केली.

पुण्यातील कसबा आणि पिंपरी-चिंचवड या विधानसभा मतदारसंघांमध्ये पोटनिवडणुकीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तळ ठोकून आहेत. तसेच या निवडणुकीत मुस्लिम मतदारांना दुबईतून बोलावण्यात येत आहे, असा प्रचार सुरू झाल्याबाबत पवार यांना विचारले असता ते म्हणाले, जर मतदार काही कामानिमित्त मतदारसंघाबाहेर असेल तर त्याने मतदानासाठी यावे, असे आवाहन कुणी करत असेल तर त्यात गैर नाही. मात्र, पराभव समोर दिसू लागला की भाजपकडून निवडणुकांना जातीय रंग देण्याचा प्रयत्न केला जातो.

भावी मुख्यमंत्री पोस्टर लावणे पोरकटपणा

जयंत पाटील, अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांचे भावी मुख्यमंत्री म्हणून पोस्टर लावणे हा पोरकटपणा आहे. हा कोणाचा तरी खोडसाळपणा आहे. एकाच पक्षातील आणि एकाच घरातील दोन व्यक्ती मुख्यमंत्रिपदासाठी दाखवणे हे आश्चर्य आहे. अशा पद्धतीची कोणतीही चर्चा अथवा प्रयत्न पक्षाकडून केले जात नाहीत.

Back to top button