उद्धव ठाकरे राष्ट्रीय नेत्यांच्या संपर्कात | पुढारी

उद्धव ठाकरे राष्ट्रीय नेत्यांच्या संपर्कात

मुंबई : पुढारी वृत्तसेवा : भाजपाविरोधात देशभरातील प्रादेशिक पक्षांची मोट बांधण्यासाठी शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पुढाकार घेतला आहे. त्यासाठी देशभरातील विविध नेत्यांसोबत ठाकरे यांची बोलणी सुरू झाली आहेत. शिव- सेना पक्ष आणि चिन्हाबाबत आज जे घडले, तोच प्रकार भविष्यात देशभरातील विरोधी पक्षांसोबत घडण्याची शक्यता आहे. त्याला वेळीच रोखण्याची आवश्यकता ठाकरे बोलून दाखवत आहेत.

शिवसेना पक्ष आणि चिन्ह एकनाथ शिंदे यांच्याकडे सोपविण्याच्या केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर उद्धव ठाकरे यांनी थेट भाजपाला अंगावर घेण्यास सुरूवात केली आहे. सत्तासंघर्षाच्या मागील सात महिन्यांत शिंदे गटाला लक्ष्य करणाऱ्या ठाकरे गटासाठी आता भाजपा हा प्रमुख विरोधक बनला आहे. भाजपाच्या राजकारणाविरोधात देशभरातील प्रादेशिक पक्षांना एकत्र करण्याचा प्रयत्न ठाकरेंनी चालविला आहे. आप नेते आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, बिहारचे मुख्यमंत्री नीतीश कुमार, बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यासोबत उद्धव ठाकरे यांनी फोनवर बोलणे केले आहे. तर, आयोगाच्या निकालानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी फोन केला होता, त्यांच्याशी चर्चा झाल्याचे स्वतः उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

महाविकास आघाडी स्थापन झाल्यापासून उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्व सोडल्याचा आरोप भाजपाकडून केला जातो. त्यालाही ठाकरे यांनी उत्तर देताना आपले हिंदुत्व राष्ट्रीयत्व असल्याचे विधान केले आहे. आम्ही हिंदुत्व सोडलेले नाही. पण, आमचे हिंदुत्व हे राष्ट्रीयत्व आहे. हिंदुत्वाचा बुरखा घालून कोणी देश गिळायला निघाला असेल तर एक कडवट राष्ट्रवादी म्हणून लढायला उभे राहिले पाहिजे, असे सांगत त्यांनी भाजपाला घेरण्याचे संकेत दिले.

Back to top button