Thackeray vs Shinde | ठाकरे गटाची याचिका अखेर दाखल, उद्या सुनावणी, निवडणूक आयोगाच्या निर्णयाला स्थगिती देण्याची मागणी | पुढारी

Thackeray vs Shinde | ठाकरे गटाची याचिका अखेर दाखल, उद्या सुनावणी, निवडणूक आयोगाच्या निर्णयाला स्थगिती देण्याची मागणी

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : शिवसेना हे पक्षाचे नाव आणि धनुष्यबाण चिन्ह शिंदे गटाला देण्याच्या केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. ही याचिका आज मंगळवारी मेन्शन करून घेण्यात आली. उद्या ३.३० वाजता या याचिकेवर सुनावणी घेण्यात येईल असे सरन्यायाधीशांनी म्हटले आहे. ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांच्यावतीने ही याचिका दाखल करण्यात आली आहे. शिंदे गटातील आमदारांच्या अपात्रतेचा मुद्दा निकालात निघेपर्यंत निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्णयाला स्थगिती दिली जावी, असा पवित्रा ठाकरे गटाने घेतला आहे. (Thackeray vs Shinde)

शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण चिन्हाच्या वादावर मागील काही महिन्यांपासून निवडणूक आयोगात सुनावणी सुरु होती. दोन्ही बाजुंकडून आवश्यक ती कागदपत्रे, प्रतिज्ञापत्रे तसेच पुरावे आयोगासमोर सादर करण्यात आले होते. त्यानंतर गेल्या आठवड्यात आयोगाने नाव आणि चिन्हावर शिंदे गटाचा अधिकार राहील, असा निकाल दिला होता. ठाकरे गटासाठी अर्थातच हा मोठा धक्का होता आणि या निकालाविरोधात ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली आहे.

याचिका मेन्शन

ठाकरे गटाकडून सोमवारी याचिका देण्यात आली होती. पण ती काल दाखल करुन घेण्यात आली नव्हती. कालच्या “लिस्टेड मेन्शनिंग”मध्ये ठाकरे गटाच्या याचिकेचा समावेश नव्हता. न्यायालयाने याबाबत ठाकरे गटाला मंगळवारी पुन्हा याचिका मेन्शन करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार ती आज मेन्शन करण्यात आली.

पक्षाचे नाव आणि चिन्हाबाबतचा निवडणूक आयोगाचा निकाल चुकीचा असून तो लोकशाहीच्या मार्गाने घेण्यात आला नसल्याचे ठाकरे गटाने याचिकेत म्हटले आहे. पक्षातील बहुतांश सदस्य आमच्या बाजुने आहेत, पण तरीही निकाल आमच्या विरोधात देण्यात आला. केवळ आमदार आणि खासदाराच्या संख्येच्या बळावर निवडणूक आयोगाने निकाल दिला आहे. जोवर सदर प्रकरणी सर्वोच्च न्यायालय आपला निर्णय देत नाही, तोवर आयोगाच्या निकालाला स्थगिती दिली जावी, असे ठाकरे गटाने म्हटले आहे.

वर्ष २०२८ मध्ये स्थापन झालेली शिवसेनेची कार्यकारिणी घटनेप्रमाणे योग्य असल्याचे सांगतानाच कार्यकारिणीने पक्षाध्यक्षाला सर्व अधिकार दिलेले आहेत, असेही ठाकरे गटाने याचिकेत नमूद केले आहे. दरम्यान, ठाकरे गटाकडून याचिका दाखल होण्यापूर्वीच शिंदे गटाने कॅव्हेट दाखल करीत सदर प्रकरणात आपले म्हणणे ऐकून घेण्याची विनंती सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेली आहे. (Thackeray vs Shinde)

Back to top button