

पुढारी ऑनलाईन डेस्क : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि बाळासाहेबांची शिवसेना यांच्यातील पक्षचिन्हाबाबतचा निर्णय निवडणूक आयोगाने निकाली काढला. शिंदे गटाला धनुष्यबाण हे चिन्ह देण्यात आले आहे. तसेच शिवाय 'शिवसेना' हे नाव देखील शिंदे गटाला देण्यात आले. आता आणखी एक धक्का ठाकरे गटाला बसला आहे. शुक्रवारी (दि.१७) निवडणूक आयोगाने घेतलेल्या निर्णयानंतर रविवारी (दि.१९) शिवसेनेच्या ट्विटर अकाउंट आणि शिवसेनेच्या वेबसाईट बाबतीत आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. ( Thackeray vs Shinde)
एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील बंडानंतर महाराष्ट्राच्या राजकारणाला नाट्यमयरित्या वळण मिळत गेले. बंडानंतर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री तर देवेंद्र फडणवीस हे उपमुख्यमंत्री झाले. त्यानंतर शिंदे आणि ठाकरे गटात शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह याबाबत वाद निर्माण झाला. हा वाद निवडणूक आयोगापर्यंत गेला. अखेर शुक्रवारी (दि.१७) निवडणूक आयोगाने शिंदे गटाच्या बाजूने निर्णय दिला.
शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या ट्विटर अकाउंटची ब्लू टिकमार्क हटवण्यात आली आहे. त्याचबरोबर शिवसेनेची जी अधिकृत वेबसाईट होती ती बंद करण्यात आली आहे. या वेबसाईटच डोमेन हे Shivsena.in असं होत. Shivsena.in यावर क्लिक करताच ही वेबसाईट ओपन होत नसली तरी शिवसेनेच्या (ठाकरे) ट्विटर अकाउंटवर अद्याप ती लिंक आहे. ठाकरे गटाकडून चालवण्यात येत असलेल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून शिवसेनेचे नाव आणि धनुष्यबाण चिन्ह दोन्हीही हटवले आहे. ट्विटर प्रोफाइल नाव बदलून शिवसेना – उद्धव बाळासाहेब ठाकरे असे करण्यात आले आहे. तर मशाल हे चिन्ह ठेवण्यात आले आहे. त्यानंतर लगेच त्याची ब्लू टिकमार्क काढून टाकण्यात आली आहे.
Shivsena.in हे डोमेन असलेली ही वेबसाईट हॅक केली अशी चर्चा सोशल मीडियासह राजकीय वर्तुळात होती. पण ठाकरे गटाकडूनच ती बंद करण्यात आल्याच सांगण्यात येत आहे.
हेही वाचा