

मुंबई, पुढारी वृत्तसेवा : घरगुती कारणावरुन आईशी भांडण झाल्याने रागाच्या भरात सोळा वर्षांच्या मुलीने चेन्नईतून मुंबईत पलायन केले होते. मुंबई दर्शन करताना जुहू पोलिसांच्या एका विशेष पथकाने तिला ताब्यात घेतले. त्यानंतर तिला पालकांकडे सोपविण्यात आल्याचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय मसवेकर यांनी सांगितले. मुलगी सुखरुप सापडल्याने पालकांनी जुहू पोलिसांचे आभार व्यक्त केले आहेत.
सोळा वर्षांची ही मुलगी तिच्या पालकांसोबत चेन्नईतील निलागारे परिसरात राहते. तीन दिवसांपूर्वी तिचे आईशी किरकोळ कारणावरुन वाद झाला होता. या वादानंतर ती आईवर प्रचंड संतापली व घरातून कोणालाही न सांगता निघून गेली. बराच वेळ होऊनही मुलगी घरी परतली नाही. त्यामुळे तिच्या पालकांसह स्थानिक रहिवाशांनी तिचा शोध सुरु केला. सर्वत्र शोध घेऊनही कुठेच सापडली नसल्याने तिच्या आईने निलागारे पोलीस ठाण्यात ती हरवल्याची तक्रार केली. पोलिसांनी शोध सुरू केला होता. दुसरीकडे ती मुलगी काही पैसे घेवून निघून चेन्नई स्टेशनवर आली. तेथून ती ट्रेनने मुंबईत आली. तपासादरम्यान वर्धा एलसीबीचे पोलीस निरीक्षक संजय गायकवाड यांना ती मुंबईत आल्याची माहिती समजली. त्यांनी जुहू पोलिसांशी संपर्क साधून तिचा शोध घेण्याची विनंती केली. तपासादरम्यान ती मुंबई दर्शनच्या वाहनातून फिरत असल्याचे समजले. पोलीस निरीक्षक मसवेकर यांनी मुंबई दर्शन वाहनाची माहिती काढून तिला ताब्यात घेतले. त्यानंतर तिला तिच्या कुटुंबियांकडे सोपविण्यात आले.
हेही वाचा :