तुम्ही दुधात मिठाचा खडा टाकलाय; उद्धव ठाकरे यांचे अमित शहांना प्रत्युत्तर | पुढारी

तुम्ही दुधात मिठाचा खडा टाकलाय; उद्धव ठाकरे यांचे अमित शहांना प्रत्युत्तर

मुंबई; पुढारी वृत्तसेवा :  केंद्रीय निवडणूक आयोगाचा निर्णय हा सरळ सरळ अन्याय आहे. चोरालाच घराचा मालक बनविण्याचा प्रकार आहे. त्यावर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी ‘दूध का दूध, पानी का पानी’ झाल्याचे वक्तव्य केले. पण, अजून सर्वोच्च न्यायालयाचा निकाल बाकी आहे. दूध का दूध झालेले नाही. तुम्ही तर दुधात मिठाचा खडा टाकला आहे, अशा शब्दांत शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी रविवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना प्रत्युत्तर दिले.

उद्धव ठाकरे यांनी आज मुंबईतील उत्तर भारतीयांसोबत संवाद साधताना पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांना टीकेचे लक्ष्य केले. शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण निशाणीच्या निर्णयावरून निवडणूक आयोगावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. आयोगाचा निर्णय हा सरळसरळ अन्याय आहे. ज्यांना जायचे होते त्यांनी दुसर्‍या पक्षात जायला हवे होते. पण, त्यांना तर आमचे घरच हवे होते. हे माझे घर आहे, माझ्या वडिलांनी त्यांना आसरा दिला होता. पण, आपल्या संस्थाही अशा आहेत की, त्यांनी चोरांनाच घराचे मालक बनविले. हा सर्व प्रकार देशभरातील सर्व पक्षांचे डोळे उघडणारा आहे. आज आमच्यावर जी वेळ आली आहे, ती उद्या तुमच्या वाटेला येईल, असा इशाराही ठाकरे यांनी सर्व राजकीय पक्षांना दिला.

जेव्हा काँग्रेस फुटली होती, तेव्हा गाय-वासरू चिन्ह गोठविण्यात आले होते, ते आजवर कुणाला दिले गेले नाही. आताही असेच काही होईल, अशी अपेक्षा होती. चिन्ह गोठवतील, त्यांचा एक गट आणि आमचा एक गट केले जाईल. त्यांना आधी बाळासाहेबांची शिवसेना म्हटलेच होते. मी तर ‘शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे’ असे स्पष्ट सांगत समोर आलो. पण आता घाणेरडे राजकारण सुरू आहे. कदाचित मशालही नेतील, अशी शक्यता आहे. त्यांनी धनुष्यबाण चोरला; पण ते लोकांच्या हृदयातला राम चोरू शकणार नाहीत. त्या रामाचे आशीर्वाद असेपर्यंत धनुष्यबाण चोरला तरी काही बिघडणार नाही, असे सांगत ठाकरे यांनी उत्तर भारतीय समाजाला सोबत येण्याचे आवाहन केले.

अमित शहा यांचा ‘मोगँबो’ असा उल्लेख करत ठाकरे म्हणाले की, आजचे मोगँबो सर्वांना एकमेकांशी लढवत आहेत. लोक आपासात भांडत राहिले की त्यांना राज्य करता येईल, असा त्यांचा हिशेब आहे. त्यांचे हिंदुत्व भांडणे लावणारे आहे. घरात आणि पक्षात भांडणे लावून सत्ता मिळवितात. द्वेष निर्माण करणारे त्यांचे हिंदुत्व मला मान्य नाही, असेही ठाकरे म्हणाले. मुंबईला आपली दासी बनविण्याच्या आड उद्धव ठाकरे आणि शिवसेना येते, म्हणून आम्हाला संपवायचे प्रयत्न सुरू आहेत, असे ठाकरे म्हणाले.

Back to top button