संभाजीराजे यांनी दिलेल्या प्रत्येक सूचनांचे पालन केले जाईल : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे | पुढारी

संभाजीराजे यांनी दिलेल्या प्रत्येक सूचनांचे पालन केले जाईल : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

पुढारी ऑनलाईन: सध्याचे सरकार हे सर्वसामान्य जनतेचे आणि शिवरायांच्या विचारांचे आहे. म्हणून आम्ही संभाजीराजे छत्रपती आणि शिवभक्तांच्या भावनेशी सहमत आहोत. पुढच्यावेळी शिवजन्मोत्सव व्यवस्थापनाविषयी नक्की काळजी घेऊ, असा शब्द मुख्यमंत्री शिंदे यांनी संभाजीराजे छत्रपती यांना दिला. व्हीआयपी लोकांसाठी शिवनेरीच्या पायथ्याशी शिवभक्तांच्या झालेल्या अडवणुकीवरून संभाजीराजे छत्रपती यांनी नाराजी व्यक्त केली. त्यानंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी शिवनेरीवरून बोलताना संभाजीराजे छत्रपती यांना हे आश्वासन दिले. शिवनेरीवरील शिवजन्मोत्सव कार्यक्रमादरम्यान ते बोलत होते.

गडकिल्ले संवर्धनात संभाजीराजे छत्रपती यांचे योगदान महत्त्वपूर्ण आहे. गडकोट किल्ले संवर्धनासाठी सरकार पुढाकार घेईल. संभाजीराजे छत्रपती यांनी गडकिल्ले संवर्धनासंदर्भात सूचना कराव्या, त्या सूचनांची हे सरकार अंमलबजाणी करेल. शिवभक्तांची झालेली गैरसोय टाळण्यासाठी संभाजीराजे यांनी दिलेल्या प्रत्येक सूचनांचे पालन केले जाईल. तसेच पुढच्या वर्षी योग्य प्रकारे नियोजन केले जाईल असे आश्वासन  देखील मुख्यमंत्री शिंदे यांनी संभाजीराजे छत्रपती आणि शिवभक्तांना योवेळी दिले.

छत्रपतीचे सेवक म्हणून काम करू-उपमुख्यमंत्री

पुढच्या वर्षी योग्य शिवभक्तांसाठी योग्य नियोजन केले जाईल. कोणत्याही शिवभक्ताची अडवणूक केली जाणार नाही. हे सरकार छत्रपतीचे सेवक म्हणून काम करेल, असे आश्वासन उपमुख्यमंत्री देवंद्र फडणवीस यांनी देखील  शिवनेरीवरून दिले.  संभाजीराजे छत्रपती यांनी शिवभक्तांची शिवनेरीवर झालेल्या अडवणूकीवर व्यक्त केलेल्या नाराजीवर उत्तर देताना ते बोलत होते.

Back to top button