

नवी मुंबई: पुढारी वृतसेवा : नवी मुंबई महापालिकेचा ४ हजार ९२५ कोटींचा अर्थसंकल्प आज (दि.१७) महापालिका प्रशासक तथा आयुक्त राजेश नार्वेकर यांनी सादर केला. ११४५.०३ कोटी आरंभीच्या शिलकेसह ४९२५ कोटी जमा व ४९२२.५० कोटी खर्चाचे आणि २.५० कोटी शिलकेचा सन २०२३-२४ चा मूळ अर्थसंकल्प महापालिकेच्या सभागृहात सादर करण्यात आला.
नवी मुंबई महापालिकेने एमएमआरडीएकडून 568.84 कोटी रूपये कर्ज म्हणून घेतले होते. हे कर्ज 12 डिसेंबर 2022 अखेर फेडण्यात आल्याने नवी मुंबई महापालिका कर्जमुक्त झाली आहे. शिक्षण विभागाच्या 1081 पदांच्या आकृतीबंध आराखड्यास राज्य सरकारची मंजूरी मिळाली आहे. त्यामुळे भरती प्रक्रियेला वेग येईल. महापालिकेच्या वैद्यकीय महाविद्यालयात 67 पदे तात्पुरत्या स्वरूपात भरली आहेत. नवी मुंबई महापालिका आस्थापनेवरील सरळसेवाच्या कोट्यातील संभाव्य 500 पदांच्या भरती कार्यवाही 2023-24 मध्ये प्रस्तावित आहे. सायन्स पार्क 23 जुलैपर्यंत पूर्ण करण्याचे महापालिकेचे नियोजन असून 123 कोटी रूपये खर्च अपेक्षित आहे. पहिल्या टप्प्यात 10 झोपडपट्टीत ग्र॔थालये सुरू केले जाणार आहेत. बहुभाषी सेंट्रल लायब्ररी उभारण्याचे नियोजन असून त्यादृष्टीने कार्यवाही सुरू आहे.
बेलापूर, नेरूळ, सारसोळे, कोपरखैरणे, घणसोली, ऐरोली सेक्टर.20, दिवागाव अशा सहा ठिकाणी गॅस वाहिनी प्रस्तावित केले आहे. तुर्भे येथील स्मशानभूमीत गॅस वाहिनी कार्यान्वित करण्यात आली आहे. यासाठी 18 कोटी रूपये खर्च केला जाणार आहे. नवीन जलस्त्रोत निर्माण करण्यासाठी 114.36 कोटी रूपये खर्च केला जाणार असून त्यासाठी एक समिती नियुक्त केली आहे. नवी मुंबई महापालिका एनआयसीचे ई हॉस्पिटल सुरू करणार आहोत. मायक्रोबायोलॉजी प्रयोग शाळा सुरू करणार आहेत.
शहरात पाच ठिकाणी शहरी आरोग्यवर्धिनी केंद्र सुरू केले जाणार आहे. एमआरआय सुविधा उपलब्ध होणार आहे. दिव्यांग काळजी केंद्र नेरूळ व बेलापूर येथे सुरू करण्यात येणार आहे. महापालिका मेडीकल कॉलेज भूखंडाचे 56 कोटी सिडकोकडे जमा केले असून भूखंड हस्तांतरित प्रकियेला सुरूवात झाली आहे. एनएमएमटी उपक्रमाला महापालिकेकडून 2023-24 साठी 274 कोटींचे अनुदान देण्यात आले आहे. नगरसेवक स्वेच्छानिधी 10 लाख तर प्रभाग निधीसाठी 60 लाखांची स्वतंत्र तरतूद करण्यात आली आहे.
हेही वाचा