मुंबईसह अनेक महानगरे जाणार समुद्रात; संयुक्त राष्ट्रांचा इशारा | पुढारी

मुंबईसह अनेक महानगरे जाणार समुद्रात; संयुक्त राष्ट्रांचा इशारा

न्यूयॉर्क; वृत्तसंस्था :  समुद्राची वाढत असलेली पाणीपातळी अखिल मानव समाजाचे भवितव्य हळूहळू बुडवत चाललेली आहे. मुंबई, न्यूयॉर्कसारख्या शहरांना त्यामुळे धोका उद्भवू शकतो, असा इशारा संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस यांनी दिला. हवामान बदलाच्या संकटाशी जगभरातील देशांनी मिळून सामना करण्याची वेळ येऊन ठेपली आहे, असेही ते म्हणाले. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत समुद्राच्या पातळीत वाढ या विषयावर महत्त्वपूर्ण बैठक झाली. त्यात गुटेरेस बोलत होते.

गेल्या ३,००० वर्षांत कधी नव्हे इतकी समुद्राची पातळी उंचावली आहे. उत्तर हिंद महासागर १८७४-२००४ दरम्यान दरवर्षी १.०६ ते १.७५ मिलिमीटर गतीने उंचावत होता. तो १९९३ ते २०१७ दरम्यान वर्षाला ३.३ मिलिमीटर गतीने उंचावतो आहे. महासागर गेल्या शतकात अधिक वेगाने तापलेलाही आहे. जागतिक तापमानवाढ १.५ अंश सेल्सिअसपर्यंत मर्यादित असली, तरी समुद्रपातळीत आणखी वाढ होईल.

२०३० पर्यंत काय ?

  • पहिल्या टप्प्यात मुंबईतून मरीन ड्राईव्ह, चेन्नईचा मरिना बीच आणखी लहान होईल.
  •  मरीन ड्राईव्हचा क्वीन नेकलेस भाग २०५० पर्यंत समुद्रात गडप होईल.
  •  २०३० पर्यंत मुंबई, कोच्ची, मंगळूर, चेन्नई, विशाखापट्टणम, तिरुवनंतपूरमचा किनारपट्टीचा भाग कमी होईल.

जगातील ‘या’ महानगरांना धोका

कैरो, लागोस, मापुटो, बँकॉक, ढाका, जकार्ता, मुंबई, शांघाय, कोपनहेगन, लंडन, लॉस एंजेलिस, न्यूयॉर्क, ब्युनोस आयर्स, सैंटियागो.

भारतातील ‘ही’ शहरे धोक्यात

भावनगर, कोच्ची, मोरमुगोआ, तूतीकोरीन, पारादीप, मुंबई, मंगळूर, चेन्नई, विशाखापट्टणम.

Back to top button