मुंबई : पुढारी वृत्तसेवा : अदानी समूहाच्या तीन कंपन्यांनी आपल्या समूहातील आघाडीच्या अदानी एंटरप्रायझेस या कंपनीसाठी आपले शेअर्स एस बी आय कॅप ट्रस्टी कंपनीकडे गहाण ठेवले आहेत. अदानी समूहाने शेअर बाजारातील घसरणीदरम्यान आपला २.५ अब्ज डॉलर्स शेअर विक्रीचा एफ पी ओ मागे घेतला असला तरी या समूहाच्या अडचणी मात्र संपत नसल्याचे रोजच्या विविध घडामोडींवरून स्पष्ट होत आहे. या समूहाच्या व्यवहाराविषयी नवनवीन माहिती आता उजेडात येत आहे. हे शेअर गहाण ठेवण्याचे प्रकरण त्याच्याच एक भाग आहे.
अदानी पोर्ट्स आणि स्पेशल इकॉनॉमिक झोन, अदानी ट्रान्समिशन लिमिटेड आणि अदानी ग्रीन एनर्जी लिमिटेड यांनी या ट्रस्टी कंपनीकडे शेअर्स गहाण ठेवले आहेत, ही माहिती खुद्द या एसबीआयकॅप ट्रस्टी कंपनीने १० फेब्रुवारीला मुंबई स्टॉक एक्सचेंजकडे दाखल केलेल्या निवेदनात दिली. ही कंपनी, देशातील सर्वात मोठ्या स्टेट बँक ऑफ इंडियाची युनिट कंपनी आहे. अदानी एंटरप्रायझेसच्या कर्जदारांचे सुरक्षा विश्वस्त म्हणून तारण प्राप्त झाले असल्याचे या ट्रस्टी कंपनीने सांगितले.
अमेरिका स्थित शॉर्ट सेलर हिंडेनबर्ग रिसर्च ने अदानी समुहावर गैरव्यवहाराचे आरोप केल्यानंतर गौतम अदानी यांच्या नियंत्रणाखाली या समुहाच्या शेअर दरात मोठी घसरण झाली असून २४ जानेवारीपासून त्यांनी १०० अब्ज डॉलर हून अधिक बाजार मूल्य गमावले आहे. हिंडेनबर्ग रिसर्चने या समुहावर स्टॉक मॅनिप्युलेशन आणि ऑफशोर टॅक्स हेव्हन्सचा दुरुपयोग आणि बेकादेशीर वापर केल्याचा आरोप केला. या समूहाने हे आरोप फेटाळून लावले असून कोणतेही चुकीचे काम केले नसल्याचा दावा केला आहे.
दरम्यान अदानी समूहाच्या रद्द केलेल्या शेअर विक्रीतील काही गुंतवणूकदारांशी असलेल्या संबंधांची चौकशी सध्या सेबी करत आहे. फिचच्या अंदाजानुसार या एज– सीद्वारे रेटिंग केलेल्या भारतीय बँकांनी दिलेल्या एकूण कर्जाच्या ०. ८ % ते १. २% कर्ज अदानी समूहाच्या घटकांना दिले आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाने आपल्या एकूण कर्ज रकमेपैकी ०.९ % किंवा सुमारे २७० अब्ज भारतीय रुपये (३. ३ अब्ज डॉलर्स ) कर्ज या समुहाला दिले आहे असे या बँकेचे अध्यक्ष दिनेश कुमार खारा यांनी म्हटले आहे. भारतीय बँकांनी या समूहाला दिलेल्या कर्जाचे प्रमाण लक्षात घेता त्याचा त्यांच्या क्रेडिट प्रोफाइलवर परिणाम होणार नाही, असे दोन जागतिक रेटिंग एजन्सींनी म्हटले आहे.