वेळापत्रकाचा घोळ नव्हे! दहावीच्या पेपरचा क्रम बदलला | पुढारी

वेळापत्रकाचा घोळ नव्हे! दहावीच्या पेपरचा क्रम बदलला

मुंबई; पुढारी वृत्तसेवा :  दहावीत शिकत असलेल्या विविध माध्यमांतील प्रत्येक निवडलेले विषय वेगवेगळे असतात, त्यामुळे विद्यार्थ्यांची विषय योजना वेग- वेगळी असते. त्यामुळे प्रवेशपत्रावर दिनांकांच्या क्रमानुसार विषयाचा पेपर न येता विषयाच्या सांकेतांक क्रमांकानुसार परीक्षेचे विषय येतात, त्यामुळे पेपर क्रमांचा बदल लक्षात ठेवा, असे आवाहन विद्यार्थी व पालकांना महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने केले आहे.

राज्य मंडळाची दहावीची परीक्षा २ मार्चला होणार आहे. या हॉलतिकीट वाटप सुरू आहे. क्रम बदलल्याच्या तक्रारी शिक्षक व विद्यार्थ्यांकडून येत आहेत. मंडळामार्फत प्रत्येक विषयाला सांकेतांक क्रमांक (सब्जेक्ट कोड) दिला जातो. प्रत्येक विद्यार्थ्यांची विषय निवड ही वेगवेगळी असते त्यामुळे प्रवेश पत्रावर (हॉल तिकीट) वर दिनाकांच्या क्रमानुसार विषयाचा पेपर न येता विषयाच्या सांकेतांक क्रमांकानुसार परीक्षेचे विषय येतात, त्यामुळे विद्यार्थ्यांनी गोंधळून जाऊ नये, असे आवाहन मंडळाने केले आहे.

हिंदी विषयाचा सांकेतांक १५ व इंग्रजी विषयाचा सांकेतांक १७ असल्याने या सांकेतांकानुसार विषयाचा क्रम निश्चित झाला आहे. दिनांकनिहाय या विषयांचा क्रम आलेला नाही. मात्र त्या विषयाच्या पुढे नमूद केलेल्या तारखांनाच सदर विषयाची परीक्षा होणार आहे. विद्यार्थी व पालकांना याबाबत अजूनही संभ्रम असेल तर शाळांनी सूचना फलकावर लावलेल्या वेळापत्रकाची माहिती घ्यावी तसेच मंडळाच्या संकेतस्थळावरही वेळापत्रक प्रसिध्द करण्यात आले आहे. सर्व शाळांना परीक्षेचे अधिकृत वेळापत्रक विभागीय मंडळामार्फत छपाई करून देण्यात आले आहे. त्या वेळापत्रकानुसार विद्यार्थ्यांनी परीक्षा द्याव्यात, असे आवाहन करण्यात आले आहे.

  • प्रवेशपत्र देण्याची कार्यवाही मार्च २०१७ पासून अमलात आणली आहे. या वर्षी यामध्ये केवळ प्रथम सत्र व व्दितीय सत्रात परीक्षा दालनात उप- स्थित राहण्याची वेळ नमूद करण्यात आलेली आहे. प्रथम सत्रात सकाळी १०.३० वाजता व दुपार सत्रात दु. २.३० वाजता विद्यार्थ्यांनी परीक्षा दालनात उपस्थित राहणे आवश्यक आहे.
  •  प्रत्यक्ष पेपरची वेळ सकाळ सत्रात ११.०० वाजता व दुपार सत्रात ३.०० वाजता अशी आहे. तरी विद्यार्थ्यांनी परीक्षा दालनात बसणे, उत्तरपत्रिकांवर आवश्यक ती माहिती भरणे, उत्तरपत्रिकांवर आवश्यक तिथे समास आखणे यासाठी या वेळेचा उपयोग करायचा आहे, असे मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी सांगितले.

Back to top button