विद्यार्थ्यांना पाणी पिण्याची आठवण कधी करणार? .. प्रस्ताव अजूनही धूळखात | पुढारी

विद्यार्थ्यांना पाणी पिण्याची आठवण कधी करणार? .. प्रस्ताव अजूनही धूळखात

मुंबई; पुढारी वृत्तसेवा :  विविध शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना अभ्यास व खेळामुळे अनेकदा पाणी पिण्याचीही आठवण राहत नाही. ही आठवण करुन देण्यासाठी शाळेत प्रत्येक अधिवेशनात तीन वेळा घंटा वाजवून विद्यार्थ्यांना पाणी पिण्याची आठवण करून देण्यात येणार होती. मात्र महापालिका सभागृहात २०१९ मध्ये मंजूर झालेल्या प्रस्तावाची अंमलबजावणी झालेली नाही. विशेष म्हणजे पालिका अधिकाऱ्यांनी याकडे फारसे गांभीर्याने घेतलेत नाही.

दररोज किमान तीन ते चार लिटर पाणी पिणे आवश्यक असल्याचे तज्ञांचे म्हणणे आहे. रक्तप्रवाह सुरळीत रहावा यासहपचनक्रिया चांगली रहावी, शरीराचे तापमान समतोल राखणे, आदी महत्वपूर्ण कार्ये शरीरातील पाणी करीत असते. दिवसभरात ठराविक वेळेच्या अंतराने आवश्यक प्रमाणात पाणी पिणे हे आरोग्याच्यादृष्टीने आवश्यक आहे. शाळेत शिक्षण घेत असताना लहान मुलांचा दिवसातील ५ ते ७ तासांचा कालावधी शाळेत जातो. या कालावधीत त्यांनी किमान तीन वेळा पाणी पिणे आवश्यक आहे. पण अभ्यास व खेळात व्यस्त असलेले मुले पाणी पिण्याकडे दुर्लक्ष करतात. केरळमध्ये शाळकरी विद्यार्थ्यांना पाणी पिण्याची आठवण करून देण्याकरिता एका सत्रात तीन वेळा घंटा वाजविण्यात येते. हीच संकल्पना मुंबईतील शाळांमध्ये राबविणे आवश्यक असल्याची ठरावाची सूचना शिवसेनेचे तत्कालीन नगरसेवक सचिन पडवळ यांनी २०१९ मध्ये पालिका सभागृहात मांडली होती. याला पालिका आयुक्तांनी मान्यता देत शाळांमध्ये घंटा वाजवण्यासंदर्भात परिपत्रक प्रसिद्ध केले आहे. मात्र शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी या सूचनेची अद्यापपर्यंत कोणत्याच शाळेत अंमलबजावणी सुरू केलेली नाही.

Back to top button