भांडुप; पुढारी वृत्तसेवा : मराठी टीव्ही मालिकांमध्ये सहकलाकारचे काम करणाऱ्या एका कलाकाराने तब्बल २२ दुचाकी चोरल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. सुनील सुभाष चौधरी (वय २८) राहणार बदलापूर असे या कलाकाराचे नाव असून त्याने बाळूमामा, मा जिजाऊ, सुख म्हणजे नक्की काय असते अश्या अनेक मराठी टीव्ही मालिकांमध्ये सहकलाकार म्हणून भूमिका साकारल्या आहेत.
कोविड काळात चित्रपट आणि मालिका यांचे चित्रीकरण बंद होते. यामुळे सुनीलला पैशाची चणचण भासल्याने त्याने मुंबई व आसपासच्या परिसरातून दुचाकी चोरायला सुरुवात केली. रस्त्यावर निर्जन ठिकाणी पार्क केलेल्या दुचाकी तो चोरायचा आणि जळगाव परिसरात त्याने या दुचाकी दहा ते पंधरा हजार रुपयांमध्ये विकल्या.
मुलुंडमधील गव्हाणपाडा विभागात रहाणाऱ्या अरविंद उकर्डे यांची दुचाकी चोरीला गेली होती. या प्रकरणी नवघर पोलिसांत गुन्हा दाखल झाला असता वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील कांबळे यांनी पोलीस उपनिरीक्षक गणेश सानप यांच्या नेतृत्वाखाली पथक नेमले.
या प्रकरणात पोलीस तपास करत असताना काही सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने त्यांना सुनील चौधरीचा ठावठिकाणा मिळाला. त्यांनी त्याला ठाणे परिसरातून ताब्यात घेतले अधिक चौकशी केली असता त्याने आत्तापर्यंत २२ दुचाकी चोरल्याची कबुली दिली आहे. त्याच्याकडून या चोरीच्या दुचाकी हस्तगत करण्यात नवघर पोलिसांना यश आले .