मुंबई, पुढारी वृत्तसेवा : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात यांच्यातील कलहावर 'सामना'ने पटोले यांच्यावर टीका करणारा अग्रलेख लिहिला आहे. त्यात पटोले यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा तडकाफडकी दिल्याने महाविकास आघाडी सरकार अडचणीत आले, असे म्हटले आहे.
राज्यपालांच्या आडमुठे धोरणामुळे अध्यक्षपदाची निवडणूक झाली नाही, पटोले हे विधानसभेचे अध्यक्ष असते तर शिवसेनेचे आमदार फुटले नसते. आणि आघाडी सरकार पडले नसते, असा आरोप 'सामना'च्या अग्रलेखात पटोले यांच्यावर ठेवला आहे.
पटोलेंचा अध्यक्षपदाचा राजीनामा काँग्रेस अध्यक्षांच्या सूचनेनुसारच काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या विधानसभा अध्यक्षपदाच्या राजीनाम्यावर 'सामना'तून केलेली टीका अयोग्य आहे. नाना पटोले यांनी तडकाफडकी निर्णय घेतलेला नव्हता. राजीनाम्याचा निर्णय काँग्रेसच्या तत्कालीन राष्ट्रीय अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या सूचनेनुसारच घेतला होता. आघाडीचा धर्म पाळत मित्रपक्षाच्या निर्णयाचा शिवसेनेने मान राखायला हवा, असे प्रत्युत्तर काँग्रेसच्या वतीने देण्यात आले.
काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढे म्हणाले की, काँग्रेस पक्षात एक निर्णय प्रक्रिया आहे. त्यानुसारच निर्णय घेतले जातात. काँग्रेस पक्षाने काय निर्णय घ्यावेत हा काँग्रेस पक्षाचा अंतर्गत विषय आहे. मित्रपक्षाच्या निर्णयावर आक्षेप घेणे व त्यावर अशी जाहीरपणे टीका करणे आघाडीच्या धर्माला अनुसरून नाही, असेही लोंढे म्हणाले.