काही लोक कोर्टाला मार्गदर्शन करताहेत; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर | पुढारी

काही लोक कोर्टाला मार्गदर्शन करताहेत; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : काही लोक सुप्रीम कोर्टाला मार्गदर्शन करायला आणि सल्ले द्यायला लागले आहेत. मी त्यावर काही बोलू शकत नाही; पण जो काही निर्णय व्हायचा तो न्यायालयातच होणार आहे, असे सांगत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर पलटवार केला.

उद्धव ठाकरे यांच्या टीकेवर बोलताना मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले की, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आमच्यासाठी अंतिम असेल. लोकशाहीत राज्यघटना, कायदा आणि नियम असतात. आम्ही कायदा आणि नियमांचे पालन करणारे लोक आहोत. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आमच्यासाठी अंतिम असेल. शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनीही उद्धव ठाकरे यांच्या टीकेवर हल्ला चढविला. ते म्हणाले, शिवसेना पक्ष आणि निवडणूक चिन्ह कोणाचे, यावर सध्या निवडणूक आयोग आणि सुप्रीम कोर्टासमोर सुनावणी सुरू आहे. उद्धव ठाकरे यांनी त्यांचे म्हणणे कोर्टासमोर मांडावे; ते पण सहानुभूतीसाठी खटाटोप करत आहेत. त्यांना काय वाटते हे महत्त्वाचे नाही; तर सुप्रीम कोर्टाला आणि निवडणूक आयोगाला काय वाटते ते महत्त्वाचे आहे. सुप्रीम कोर्ट किंवा निवडणूक आयोग उद्धव ठाकरे यांचे म्हणणे कशासाठी ऐकेल? त्यांची सुरू असलेली ही सगळी धडपड व्यर्थ आहे. मी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उद्धव ठाकरे यांची भेट घडवून आणली होती. त्यावेळी चूक दुरुस्त करायची संधी होती. उद्धव ठाकरे महाविकास आघाडीतून बाहेर पडणार होते; पण निर्णय घेतला नाही.

Back to top button