Ajit Pawar: लावणीतील अश्लिलतेवर अजित पवारांचा आक्षेप; म्हणाले यापुढे…! | पुढारी

Ajit Pawar: लावणीतील अश्लिलतेवर अजित पवारांचा आक्षेप; म्हणाले यापुढे...!

पुढारी ऑनलाईन डेस्क : लावणी नृत्यांगना गौतमी पाटील हिच्या कार्यक्रमाची चर्चा सर्वत्र होऊ लागली आहे. काही ठिकाणी वादाचे प्रसंगही समोर आले आहेत. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे नेते व विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी मोठा निर्णय घेतला आहे. याबाबत त्यांनी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना आणि कार्यकर्त्यांना सक्त सुचना दिल्या आहेत. राष्ट्रवादी चित्रपट, साहित्य, कला आणि सांस्कृतिक विभागाची नुकतीच बैठक झाली. यात पवार यांनी लावणीच्या नावाखाली अश्लील नाच करणाऱ्या कलाकारांच्या कार्यक्रमाच्या आयोजनाला राष्ट्रवादी पक्षात बंदी घालण्याचा निर्णय घेतला.

या बैठकीत सांस्कृतिक विभागाच्या ठाणे जिल्हाध्यक्ष मेघा घाडगे यांनी अश्लील कार्यक्रम आयोजन केल्याचा मुद्दा उपस्थित करत नाराजी व्यक्त केली. अश्लिल लावणी कार्यक्रमाचे राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून आयोजन करण्यात येत आहे, अशी तक्रार मेघा घाडगे यांनी पवार यांच्याकडे केली. त्यानंतर पवार (Ajit Pawar)  यांनी राज्यभरात कुठेही पक्षाच्या कार्यक्रमात किंवा पदाधिकऱ्यांनी अशा कार्यक्रमाचे आयोजन न करण्याच्या सूचना दिल्या.

राज्यात लावणींच्या नावाखाली अश्लील डान्सचे प्रकार वाढू लागले आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीने ही भूमिका घेतली आहे. याबाबत पक्षाकडून पत्रक काढण्यात येईल. आणि राज्यातील सर्व पदाधिकाऱ्यांना कळविण्यात येईल. तसेच लावणी कार्यक्रमासाठी सेन्सॉर सुरू करण्यासाठी प्रयत्न केले जातील, असेही पवार यांनी सांगितले. महाराष्ट्राच्या संस्कृतीला, परंपरेला शोभेल, असे कार्यक्रम झाले पाहिजेत. त्यात अश्लीलता नसावी. राष्ट्रवादीला असले कार्यक्रम अजिबात मान्य नाहीत. अधिवेशनात हा मुद्दा मांडणार असून कोणी चुकीचे करत असेल, तर त्यांना रोखले पाहिजे, असेही पवारांनी सांगितले.

दरम्यान, पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील बहिरवाडी गावात गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात तरुणांनी मोठा गोंधळ घालत हुल्लडबाजी करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे कार्यक्रम थांबविण्याची वेळ आली. तर कार्यक्रम पुन्हा सुरू होण्यासाठी गावातील महिला हातात काठ्या घेऊन उभ्या राहिल्या होत्या.

 

हेही वाचा 

Back to top button