बाळासाहेब थोरात यांचे विधिमंडळ नेतेपद धोक्यात? भाचा सत्यजित तांबेप्रकरणी कारवाईचे संकेत | पुढारी

बाळासाहेब थोरात यांचे विधिमंडळ नेतेपद धोक्यात? भाचा सत्यजित तांबेप्रकरणी कारवाईचे संकेत

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : विधान परिषद निवडणुकीत नाशिक पदवीधर मतदारसंघात युवक काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे यांच्या बंडखोरीचे प्रकरण आता पेटले आहे. प्रदेश काँग्रेसमध्ये रंगलेल्या शह-काटशहाच्या राजकारणाचा फटका बाळासाहेब थोरात यांना बसणार असून थोरात यांचे काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेतेपद काढून घेतले जाण्याची शक्यता आहे. तांबे यांनी बंडखोरी केल्यानंतर संपूर्ण निवडणुकीत थोरात यांनी मौन पाळले होते. तसेच निवडणुकीनंतर त्यांनी सत्यजित तांबे यांची पाठराखण केल्याने काँग्रेस श्रेष्ठी नाराज असल्याची माहिती काँग्रेसच्या सूत्रांनी दिली.

थोरात हे सत्यजित तांबे यांचे मामा आहेत. नाशिक पदवीधर निवडणुकीत खांद्याला फ्रॅक्चर झाल्याने ते रुग्णालयात होते. मात्र थोरात यांना महाविकास आघाडीच्या उमेदवार शुभांगी पाटील यांना पाठिंबा देता आला असता. त्यांना मतदारांना आवाहन करता आले असते. असे असताना थोरात यांनी सोयीस्कर मौन पाळले. एकप्रकारे थोरात यांनी अपक्ष उमेदवार तांबे यांनाच मदत केली, अशी चर्चा काँग्रेसमध्ये आहे. त्याचा फटका थोरात यांना बसेल, असे बोलले जात आहे.

सत्यजित तांबे हे भाजपच्या संपर्कात असल्याचे स्पष्ट झाले आहे. ते भाजपमध्येही जाऊ शकतात. महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनीदेखील तांबे यांना भाजपमध्येच यावे लागेल असे संकेत दिले आहेत. अशावेळी विधिमंडळ पक्षाचे नेतेपद बाळासाहेब थोरात यांच्याकडे राहणे काँग्रेसला परवडणारे नाही. त्यामुळे लवकरच त्यांना या पदावरून हटविले जाईल, असे काँग्रेसमधून सांगण्यात येत आहे.

15 फेब्रुवारीला वादावर चर्चा

15 फेब्रुवारी रोजी मुंबईत प्रदेश काँग्रेसची बैठक होणार आहे. राज्य प्रभारी एच. के. पाटील हे नवनिर्वाचित आमदारांचा सत्कार करणार आहेत. यावेळी काँग्रेसचे सर्वच वरिष्ठ नेते मुंबईत असतील. एच. के. पाटील थोरात – पटोले वादावर चर्चा करणार आहेत. त्यानंतर ते आपला अहवाल दिल्लीत पक्षश्रेष्ठींना देणार असल्याचे समजते.

Back to top button