"नाणारच्या अवतीभोवती जमिनी घेतलेल्यांची नावं फडणवीसांनी जाहीर करावी" : संजय राऊत | पुढारी

"नाणारच्या अवतीभोवती जमिनी घेतलेल्यांची नावं फडणवीसांनी जाहीर करावी" : संजय राऊत

पुढारी ऑनलाईन डेस्क : नाणारच्या अवतीभोवती ज्यांनी जमिनी घेतल्या आहेत त्यांची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यादी जाहीर करावी. तेथे जमिनी घेतलेल्यांसाठी नाणार प्रकल्प आणला जात आहे. ही गुंतवणूक कोणाची आहे? गुंतवणकदार कोण आहेत? ते कोठून आले आहेत? याची माहिती सरकारने जाहीर करावी, अन्यथा आम्ही करू, असा इशारा देत ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी महाराष्ट्रात नाणार प्रकल्प आणणारचं या सरकारच्या भूमिकेवर बोट ठेवले. आज (दि. ६) दिल्ली येथे माध्यमांशी त्यांनी संवाद साधला.

ते म्हणाले, संसदेतील भूमिका ठरवण्यासाठी विरोधी पक्षांच्या खासदारांची आज बैठक होणार आहे. सरकार जो अमृतकाळ म्हणत आहे त्यात महाघोटाळा समोर आला आहे. त्यावर संसदेतील अधिवेशनात भूमिका घेण्यासाठी सर्व विरोधक मिळून निर्णय घेवू. ६७ वर्षात एलआयसीचा एक रूपयांचाही तोटा झाला नाही. पण गेल्या ७ वर्षात ५० हजार कोटींच नुकसान झालं असल्याचे त्यांनी सांगितले.

सध्याचे काँग्रेसचे विषय हे अंतर्गत आहेत. बाळासाहेब थोरात यांच्याविषयी निष्ठावाण काँग्रेस नेते म्हणून आदर आहे. सध्या अपघातात जखमी झाल्याने ते आजारी आहेत. महाविकासआघाडी सरकारच्या काळात ते मंत्री होते. त्यांनी पक्ष आणि सरकार चालवायला मदत केली, हे मान्य केले पाहिजे. त्यांचे ते अंतर्गत विषय आहेत. थोरात काँग्रेसचे जुने नेते आहेत. नेत्याच्या आजारपणाचा फायदा घेवून त्यांच्याविरोधात कोणत्याही पक्षाने कारवाई करणे अमानुष आहे, असेही त्यांनी म्हटले आहे. दरम्यान पोटनिवडणूकांबाबत बोलताना त्यांनी मुख्यमंत्री किंवा अन्य कोणीही आव्हान करूदेत दोन्ही निवडणुका होणार. महाविकासआघाडीत मतभेद नाहीत. निवडणुका एकत्र लढणार असल्याचे सांगितले.

Back to top button