मुंबईत 23 आलिशान फ्लॅट्सची विक्री 1,200 कोटी रुपयांना; भारतातील सर्वात मोठा अपार्टमेंट व्यवहार

मुंबई, पुढारी वृत्तसेवा : मुंबईतील वरळीमध्ये मोक्याच्या ठिकाणी असलेल्या निवासी प्रकल्पातील 23 आलिशान घरे (फ्लॅट्स) सुमारे 1,200 कोटी रुपयांना विकली गेली आहेत. देशातील हा बहुधा सर्वात मोठा अपार्टमेंट व्यवहार आहे.
डी मार्टचे संस्थापक राधाकिशन दमानी यांचे कुटुंब, नातेवाईक, मित्र आणि जवळच्या सहकार्यांनी वरळी येथील डॉ. अॅनी बेझंट रोड येथील प्रीमियम लक्झरी प्रोजेक्ट असलेल्या थ्री सिक्स्टी वेस्टच्या टॉवर बी मध्ये हे विस्तीर्ण अपार्टमेंट्स खरेदी केले आहेत. व्यापारी-बिल्डर सुधाकर शेट्टी यांनी हा व्यवहार केला असून या प्रकल्पातील त्यांच्या अपार्टमेंटमधील शेवटचा हिस्सा विकला. प्रकल्पाचा पुनर्विकास करण्यासाठी त्यांनी बिल्डर विकास ओबेरॉय यांच्यासोबत भागीदारी केली होती.
प्रत्येक अपार्टमेंटचा आकार सुमारे 5,000 चौरस फूट आहे आणि त्यांना 50-60 कोटी रुपये मिळाले आहेत. 23 अपार्टमेंटच्या विक्रीतून मिळालेली संपूर्ण रक्कम शेट्टी यांनी पिरामल फायनान्सकडून घेतलेल्या सुमारे 1 हजार कोटी रुपयांच्या कर्जाची परतफेड करण्यासाठी वापरली.
या फ्लॅटची मोठ्या प्रमाणात खरेदी करण्यात आल्याने सवलतीच्या दरात विक्री करण्यात आल्याचे प्रॉपर्टी मार्केटमधील माहीतगारांनी सांगितले. शेट्टी यांच्यावर कर्ज फेडण्यासाठी दबाव होता. शेट्टी यांनी हाँगकाँगस्थित एस. सी. लोवी या जागतिक बँकिंग आणि मालमत्ता व्यवस्थापन ग्रुपकडून सुमारे 400 कोटी रुपयांचे कर्जही घेतले होते.
थ्री सिक्स्टी वेस्टमधील काही मोठ्या अपार्टमेंट्सची यापूर्वी 75-80 कोटी रुपयांना विक्री झाली होती. गेल्या वर्षी, आयजीई (इंडिया) प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने 151 कोटी रुपयांना या प्रकल्पातील दोन अपार्टमेंट्स खरेदी केले होते. या प्रकल्पात दोन टॉवर आहेत आणि ओबेरॉय रिअॅल्टी आणि शेट्टी यांच्या सहाना ग्रुप यांच्यातील संयुक्त उपक्रम असलेल्या ओएसिस रियल्टीने विकसित केले आहे. एका टॉवरमध्ये रिट्झ कार्लटन हॉटेल आणि हॉस्पिटॅलिटी ब्रँडद्वारे व्यवस्थापित इतर लक्झरी निवासी घरे असतील.
डी मार्टच्या दमानी यांनी गेल्या काही वर्षांत मोक्याच्या ठिकाणी असलेल्या प्रॉपर्टीज मिळवल्या आहेत. 2021 मधील व्यवहाराची नोंद देशातील सर्वात मोठी निवासी मालमत्ता व्यवहार म्हणून झाली. राधाकिशन दमानी आणि त्यांचे भाऊ गोपीकिशन यांनी दक्षिण मुंबईतील नारायण दाभोलकर रोड येथे 1,001 कोटी रुपयांना एक बंगला खरेदी केला आहे. मधु कुंज हा बंगला, टोनी मलबार हिलमध्ये 60,000 चौरस फूट पेक्षा जास्त क्षेत्रफळ असलेल्या प्राइम 1.5 एकर जमिनीवर आहे. ग्राऊंड-प्लस-वन-मजली बंगला आर्ट डेको शैलीमध्ये बांधला गेला आहे. पुरातन पद्धतीचे बांधकाम (हेरिटेज) अशी त्याची अनेक वैशिष्ट्ये आहेत.