मुंबईची हवा अतिघातक! | पुढारी

मुंबईची हवा अतिघातक!

मुंबई; पुढारी वृत्तसेवा :  मुंबईतील वाढते प्रदूषण लोकांच्या आरोग्यासाठी घातक नव्हे तर अतिघातक ठरत आहे. मुंबईमध्ये शनिवारी प्रदूषण पातळी पीएम २.५ इतकी नोंदली गेली. जागतिक आरोग्य संघटनेच्या (डब्ल्यूएचओ) २४ तास हवा गुणवत्ता मार्गदर्शक तत्त्वे दिलेल्या मूल्याच्या शिफारस केलेल्या मर्यादेपेक्षा ही पातळी ६.९ पट जास्त आहे.

गेल्या ४ दिवसांतील एक्यूआय प्रदूषण पातळी आरोग्यासाठी घातक आहेच. मात्र रविवारपासून ही पातळी आणखी घसरून प्रदूषण आणखी वाढण्याची शक्यता आहे. प्रामुख्याने, लहान मुले, वृद्ध तसेच श्वसनाच्या रोगांनी त्रस्त रुग्ण अशा संवेदनशील गटांच्या लोकांच्या आरोग्यासाठी ही चिंतेची बाब ठरू शकते.

हिवाळा सुरू झाल्यापासून मुंबईचा एअर क्वालिटी इंडेक्स (एक्यूआय) चिंताजनक पातळी नोंदवत आहे. भारतातील शहरांमधील प्रदूषण आणि हवेच्या गुणवत्तेचा मागोवा घेणारी सरकारी देखरेख प्रणाली असलेल्या सिस्टम ऑफ एअर क्वालिटी अँड वेदर फोरकास्टिंग अँड रिसर्चच्या (एसएएफएआर) रेकॉर्डिंगनुसार, जानेवारीमध्ये २३ दिवस एक्यूआय हा ३०० ते ४०० दरम्यान होता. २०० वरील कोणताही आकडा खराब हवेची गुणवत्ता आणि आरोग्यासाठी घातक मानली जाते आणि ३०० वरील कोणतीही गोष्ट लोकांच्या आरोग्यासाठी आणि पर्यावरणासाठी गंभीरपणे धोकादायक आहे.

Back to top button