डोंबिवली : पर्स चोरी केल्याचा संशय घेत दोन जणांना घरात डांबून मागितली खंडणी | पुढारी

डोंबिवली : पर्स चोरी केल्याचा संशय घेत दोन जणांना घरात डांबून मागितली खंडणी

डोंबिवली : पुढारी वृत्तसेवा – एकाच रेल्वेतून प्रवास करणाऱ्या प्रवाशाने पत्नीची पर्स चोरल्याचा आरोप दोन सहप्रवाशांवर केला. त्या दोघांना भिवंडी येथे डांबून ठेवल्याची घटना घडली आहे. या संदर्भात कल्याण जीआरपी येथे गुन्हा वर्ग करण्यात आला असून आरोपीस अटक करण्यात रेल्वे पोलिसांना यश आले आहे.

जयनगर ते मुंबई पावन एक्सप्रेसने प्रवास करणारा आरोपी अझर शेख आताहूर रहमान हे आपल्या पत्नीसह प्रवास करत होते. याच रेल्वे डब्यातून सज्जात शेख (वय २१) आणि सजीज शेख (वय १८) हे देखील प्रवास करत होते. प्रवासादरम्यान रहमान यांच्या पत्नीची पर्स गाडीतून चोरीस गेली होती. पर्समध्ये काही पैसे असल्याने सहप्रवासी असणाऱ्या सज्जात आणि सजीत शेख यांच्यावर अजर रहमान यांनी पर्स आणि पैसे चोरी केले असल्याचा संशय व्यक्त केला.

इतकेच नव्हे तर कल्याण स्थानकात उतरल्यानंतर आरोपी रहमान या दोघांनाही थेट भिवंडी येथील एका घरात घेऊन गेला. याच घरात त्यांना दोन दिवस डांबून ठेवले. इतकेच नव्हे तर त्यांच्या घरच्यांकडून ५० हजार रुपयांची खंडणी मागितली. दरम्यान सज्जात आणि सजीत यांच्या नातेवाईकांनी मुंबई नागपाडा पोलीस ठाण्यात हे दोघेही हरवल्याची तक्रार दाखल केली. त्यानंतर ही तक्रार कल्याण रेल्वे पोलिसांच्या हद्दीत वर्ग करण्यात आली. या संदर्भात शोध घेतला असता घडलेला प्रकार समोर आला आहे. आरोपी अजर शेख अताहून रहमान यांना अटक केली असल्याची माहिती कल्याण रेल्वे पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मुकेश ढगे यांनी दिली.

 

Back to top button