जुनी पेन्शन, ‘मविआ’च्या एकजुटीने भाजपला पराभवाचा धक्का | पुढारी

जुनी पेन्शन, ‘मविआ’च्या एकजुटीने भाजपला पराभवाचा धक्का

मुंबई; दिलीप सपाटे :  विधानपरिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या पाच जागांसाठी झालेल्या निवडणुकीत नागपूर शिक्षक आणि अमरावती पदवीधर मतदारसंघ या बालेकिल्ल्यात भाजपवर पराभवाची नामुष्की ओढवली आहे. जुन्या पेन्शनच्या रूपाने शिक्षकांमध्ये असलेली खदखद आणि या निवडणुकीत महाविकास आघाडीची झालेली एकजूट भाजपच्या पराभवाला कारणीभूत ठरली. विशेषतः उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना आपल्या घरच्या मैदानावर पराभवाचा सामना करावा लागला आहे.

नागपूर शिक्षक आणि अमरावती पदवीधर या परंपरागत जागा भाजपने गमावल्या आहेत. औरंगाबाद शिक्षक मतदारसंघात सर्व ताकद पणाला लावूनही भाजपला राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार विक्रम काळे यांचा विजय रोखता आला नाही. त्यामुळे निकालानंतर भाजपच्या गोटात शांतता तर महाविकास आघाडीच्या गोटात जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले आहे.

नागपूर शिक्षक मतदारसंघाची जागा भाजपपुरस्कृत शिक्षक परिषदेने लढवली. एक प्रामाणिक लोकप्रतिनिधी अशी ओळख असलेल्या गाणार यांच्यात शिक्षकांचे प्रश्न सोडवण्यासाठी आवश्यक असलेली आक्रमकता नाही, असा प्रचार करण्यात आला होता. तसेच जुन्या पेन्शनचा मुद्दा आडबाले यांनी प्रचारात लावून धरल्याने शिक्षकांनी गाणार यांची साथ सोडत आडबाले यांच्या पारड्यात मते टाकली. गाणार यांना जुन्या पेन्शनचा मुद्दा शिक्षकांमध्ये धगधगत असल्याची जाणीव झाली होती. त्यामुळे त्यांनी उमेदवारी अर्ज भरताना जुनी पेन्शन वाक्य लिहिलेली टोपी परिधान केली. मात्र, मतदारांच्या डोक्यावर ती काही बसली नाही. हा मुद्दा प्रचारात तापत आल्याची जाणीव देवेंद्र फडणवीस यांना झाली होती. त्यामुळेच त्यांनी ही जुनी पेन्शन योजना लागू करणार नाही, या निर्णयावर घूमजाव करत या योजनेचा पुनर्विचार करण्याचे संकेत प्रचारात दिले. नंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही जुन्या पेन्शन योजनेचा सकारात्मक विचार सुरू असल्याचे सांगितले. पण, गुरुजींना त्यावर काही भरोसा वाटला नाही हेच निकालावरून दिसते.

औरंगाबाद शिक्षक मतदासंघाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार विक्रम काळे यांनीही आपल्या कामाच्या जोरावर चौकार ठोकला. काळे यांनी भाजपच्या किरण पाटील यांचा पराभव केला. औरंगाबाद विभागीय शिक्षक मतदारसंघाची जागा यापूर्वी भाजपपुरस्कृत शिक्षक परिषदच लढवीत होती. यावेळी भाजपने स्वतः ही निवडणूक लढविली; पण ते विक्रम काळे यांना रोखू शकले नाहीत.

अमरावती पदवीधर मतदारसंघात माजी गृह राज्यमंत्री रणजित पाटील यांना पराभवाचा धक्का बसला. या ठिकाणी भाजप सहज विजयी होईल, असा अंदाज वर्तविण्यात येत होता. गेल्या दोन निवडणुका रणजित पाटील यांनी सहज जिंकल्या. काँग्रेसच्या धीरज लिंगाडे यांनी चुरशीच्या लढतीत विजय मिळविला; पण त्यांना उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसनेही मनापासून साथ दिली.

कोकणात भाजपच्या ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी पहिल्या फेरीतच विजय मिळविला. म्हात्रे हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील बाळासाहेबांच्या शिवसेनेचे कार्यकर्ते;पण त्यांना भाजपने तिकीट दिले होते. या मतदारसंघात स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लक्ष घातले होते. त्यांनी आपले मंत्री, आमदार आणि पदाधिकार्‍यांना कामाला लावले. त्यामुळे भाजपला शिंदे गटाच्या ताकदीच्या जोरावर येथे सहज विजय मिळविता आला. तर नाशिक पदवीधर मतदारसंघातील निवडणूक एकतर्फी ठरली. अपक्ष सत्यजित तांबे यांनी सहज विजय मिळविला. डॉ. सुधीर तांबे यांनी काँग्रेसने तिकीट देऊनही ऐनवेळी उमेदवारी अर्ज भरणे टाळले. त्यांचे पुत्र युवक काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे यांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करून काँग्रेसला धक्का दिला. त्यामुळे शुभांगी पाटील यांना पाठिंबा देणे महाविकास आघाडीला भाग पडले होते. पण सत्यजित तांबे यांनी आधीपासून या निवडणुकीची तयारी केली असल्याने आणि त्यांना भाजपचीही मदत झाल्याने त्यांचा विजय सुकर झाला; पण एकंदर निकाल पाहता भाजपच्या पदरी निराशाच आली आहे.

Back to top button