मुंबईचा नवा अर्थसंकल्प असेल जुन्याच प्रकल्पांचा | पुढारी

मुंबईचा नवा अर्थसंकल्प असेल जुन्याच प्रकल्पांचा

मुंबई; पुढारी वृत्तसेवा :  मुंबई महानगरपालिकेचा २०२३ – २४ चा अर्थसंकल्पाचे काम अंतिम टप्प्यात असून या अर्थसंकल्पात शहरात सुरू असलेल्या कोस्टल रोडसह गोरेगाव मुलुंड लिंक रोड, सांडपाणी पुनर्प्रक्रिया केंद्र यासह अन्य जुन्या कामांना प्राधान्य देण्याचे ठरवले आहे. यासाठी आठ ते नऊ हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त आर्थिक तरतूद करण्यात येणार आहे.

मुंबई महानगरपालिकेचा २०२३ २४ चा अर्थसंकल्प ४ फेब्रुवारीला मुंबई महापालिका आयुक्त प्रशासक इक्बालसिंह चहल प्रसिद्ध करणार आहेत. पहिल्यांदाच लोकप्रतिनिधींचा हस्तक्षेप नसलेला मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प राहणार आहे. या अर्थसंकल्पात शहराच्या विकासासाठी कोणत्या कामांना प्राधान्य देण्यात यावे, याबाबत मुंबईकर नागरिकांचे पालिका प्रशासनाने मत मागवले होते. मात्र याला फारसा प्रतिसाद मिळाला नाही. मुंबईत सध्या कोस्टल रोडचे काम अंतिम टप्प्यात असून गोरेगाव मुलुंड लिंक रोड सांडपाणी
पुनर्प्रक्रिया केंद्र, रस्त्यांचे सिमेंट काँक्रिटीकरण, गारगाई पिंजाळ पाणीपुरवठा प्रकल्प, जुन्या जलवाहिन्या बदलून नवीन जलवान टाकणे, सांडपाणी वाहून नेण्यासाठी मल:निसारण वाहिन्यांचे सक्षमीकरण करणे. पावसाळ्यात पाण्याचा तातडीने निचरा होण्यासाठी पर्जन्य जलवाहिन्यांचे आकारमान वाढवणे. व अन्य कामांना प्राधान्य देऊन यासाठी आठ ते नऊ हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त आर्थिक तरतूद करण्यात येणार असल्याचे समजते.

मुंबई महानगरपालिकेच्या २०२२-२३ चा ४५ हजार ९३९ कोटी रुपयाचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला होता. या अर्थसंकल्पात विकास कामांसाठी १८ हजार ८४४ कोटी रुपयाची आर्थिक तरतूद करण्यात आली होती. यावेळी अर्थसंकल्पाचे आकारमान काही प्रमाणात वाढण्याची शक्यता असून विकास कामांच्या आर्थिक तरतूदिमध्येही वाढ करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. यावेळीचा अर्थसंकल्प प्रशासकीय असला तरी येणारी मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक लक्षात घेऊन नगरसेवक निधीसाठी ‘अर्थसंकल्पात विशेष तरतूद करण्यात येणार असल्याचे समजते… दरम्यान गुरुवार २ फेब्रुवारीपर्यंत नागरिकांनी सुचवलेल्या विकास कामांसाठी आर्थिक तरतूद करण्यात येणार असल्याचेही सांगण्यात येत आहे.

Back to top button