सांगा दादर कुणाचे ?... ठाकरे - शिंदे - मनसेत चढाओढ | पुढारी

सांगा दादर कुणाचे ?... ठाकरे - शिंदे - मनसेत चढाओढ

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : दादर, शिवाजी पार्क हा भाग गेल्या अनेक वर्षापासून शिवसेनेचा बालेकिल्लाच राहिला आहे. मात्र शिवसेनेमध्ये पडलेली फूट, ठाकरे शिंदे गटांमध्ये असलेली चुरस तर दुसरीकडे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे असलेले आव्हान यामुळे दादर, शिवाजी पार्क नेमके कुणाचे.. असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडला असून या प्रश्नाला मुंबई महानगरपालिका निवडणुकीनंतरच उत्तर मिळणार आहे.

शिवाजी पार्कवर अनेक वर्ष धडाडलेली शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची तोफ, शिवसेना भवनातून मुंबईवर केलेले राज्य,
यामुळे सुरुवातीपासूनच दादर शिवाजी पार्कवर शिवसेनेची छाप राहिली आहे. मनसेचा जन्म झाल्यानंतर काही वर्ष शिवाजी पार्कवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची पकड होती. मात्र ही पकड फार टिकवता आली नाही. २०१७ मध्ये झालेल्या मुंबई महापालिका निवडणुकीत या भागातून मनसेला पराभवाचा सामना करावा लागला होता. २०१९ च्या विधानसभेतही मनसेचे नितीन सरदेसाई यांना पराभव पत्करावा लागला. मात्र आता दादर, शिवाजी पार्क या विभागात शिवसेनेमध्ये मोठी फूट पडली आहे. शिवसेनेचेच आमदार सदा सरवणकर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटात दाखल झाल्यामुळे शिवसेनेचे काही प्रमाणात वर्चस्व कमी झाल्याचे दिसून येत आहे. शिवसेनेमध्ये पडलेल्या फुटीचा फायदा उठवण्यासाठी मनसेही सक्रिय झाली आहे. शिवाजी पार्क दादरवर तब्बल पाच वर्ष सत्ता भोगणाऱ्या मनसेने या विभागातून पुन्हा भरारी घेण्यासाठी रणनीती आखली आहे.

भाजपाने मनसेला साथ दिल्यास शिंदे गटाला माघार घ्यावी लागेल. आमदार सदा सरवणकर शिंदे गटात असल्यामुळे या विभागात शिंदे गट दावा करू शकतो. विधानसभा निवडणुकीतही भाजपने मनसेला साथ दिली तर, शिंदे गटाचे आमदार सरवणकर यांचे राजकीय भवितव्य अडचणीत येऊ शकते.

शिवाजी पार्कातील पदाधिकारी

आमदार शिंदे गट (मूळ शिवसेना आमदार)

  खासदार शिंदे गट (मूळ शिवसेना खासदार)

२०१७ : पक्षनिहाय नगरसेवक

शिवसेना :   ७
भाजप    :   १
काँग्रेस    :   २
राष्ट्रवादी काँग्रेस :  १

Back to top button