बिहार – मुंबई गुटखा तस्करीचा पर्दाफाश | पुढारी

बिहार - मुंबई गुटखा तस्करीचा पर्दाफाश

डोंबिवली; पुढारी वृत्तसेवा : बिहार ते मुंबई अशा मेल एक्स्प्रेसमधून चक्क गारेगार हवा खात लाखोंची गुटखा तस्करी करण्याऱ्या तिघा तस्करांचा प्लॅन कल्याण लोहमार्ग पोलिसांनी उद्ध्वस्त केला. आणि या एसीबोगीत तस्करांना चांगलाच घाम फुटला. पोलिसांनी या मेल एक्स्प्रेसच्या बोगीतून जवळपास गुटख्याच्या १७ गोण्या हस्तगत केल्या. तर या तिन्ही बदमाशांना पोलीस कोठडीचा रस्ता दाखवला आहे.

याप्रकरणी अली मुस्ताक मरहम (२८, राहणार भिवंडी, आझमगढ, उत्तरप्रदेश), कृष्णा सतिष मूळचा गुप्ता (३५ राहणार कल्याण) आणि खेमराज भद्रीप्रसाद प्रजापती (४८, राहणार कुर्ला, मूळचा हामिरपुर, उत्तरप्रदेश) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. कल्याणच्या लोहमार्ग कोर्टात हजर केले असता कोर्टाने या तिघांना अधिक चौकशीकरिता पोलीस कोठडी ठोठावली आहे. तर यातील आरोपी खेमराज प्रजापती हा रेल्वेत हमाल म्हणून काम करतो.

महाराष्ट्रात तंबाखूजन्य गुटख्यावर कडेकोट बंदी असतानाही परराज्यातून महाराष्ट्रात गुटख्याची रसद पुरविण्याचे गोरखधंदे चोरीछुपे सुरू असल्याची माहिती कल्याणच्या लोहमार्ग पोलिसांना मिळली होती. त्यानूसार बिहारहून मुंबईकडे येणाऱ्या छापरा- लोकमान्य टिळक टर्मिनल मेल-एक्स्प्रेसमधून सदर गुटख्याची तस्करी होत असल्याची माहिती कल्याणच्या लोहमार्ग पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे छापरा-लोकमान्य टिळक टर्मिनस मेल शुक्रवारी रात्री ११.४९ वाजण्याच्या सुमारास रेल्वे स्थानकावर येताच, वरिष्ठ पोलिस निरीक्षक मुकेश ढगे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने तपासणी सुरू केली. यावेळी कधी नव्हे ते एसी बोगीचा देखील समावेश करण्यात आला. आणि या एसी बोगीमध्येच सदरील घबाड आरोपींसह सापडले.

आरोपींनी केला होता एसी बोगीचा वापर

शक्यतो पोलीस तपासणीमध्ये एसी बोगीची कोणीही तपासणी करत नाही. नेमका याचाच फायद घेण्याचे आरोपींने ठरवले होते. शिवाय आरोपीमधील एक रेल्वेतील हमाल असल्याने तो सदरच्या मालाची चढ-उतार करत असे.. मात्र ही युक्ती चालली नाही. पोलिसांनी यावेळी एसी बोगीचीही तपासणी करण्याचे ठरवले होते. आणि नेमके त्यामध्ये मालासह आरोपी पोलिसांच्या हाती लागले.

Back to top button