पुढारी ऑनलाईन : तामिळनाडूजवळ अरबी समुद्रावर चक्री अभिसरण तयार झाल्याने केरळ आणि तामिळनाडूवर ढग जमा होऊ लागले आहेत. त्यामुळे पुढच्या २४ तासात राज्यात अंशत: ढगाळ सदृष्य वातावरण राहणार आहे. तसेच बुधवारी (२५) राज्यातील काही भागात तुरळक पावसाची शक्यताही हवामान विभागाने व्यक्त केली आहे.
वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे उत्तरेकडील जम्मू काश्मिर, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, लेह लडाख राज्यात हवामान विभागाने बर्फवृष्टीचा इशारा दिला आहे. शिवाय नैऋत्य राजस्थान भागात वादळ स्थिती निर्माण झाली आहे. त्याचा परिणाम राजस्थानसह छत्तीसगड, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रातही दिसून येणार आहे. राज्यात ढगाळ वातावरण राहणार असून काही भागात पावसाचा इशाराही हवामान विभागाकडून देण्यात आला आहे.
गेल्या काही तासांतमध्ये राज्यातील अनेक जिल्ह्यांत किमान तापमान कमी झाल्याने पुन्हा एकदा थंडी जाणवत आहे. पुण्यातील तापमानाचा पारा १३ अंशापर्यंत घसरला असून पुन्हा पुण्यात थंडी वाढली आहे. तसेच कोकण किनारपट्टीवर थंड वारे वाहत असल्याने, याचा परिणाम उत्तरेकडील किमान तापमानात घट होणार आहे. यामुळे राज्याच्या उत्तरेकडील शहरांमध्ये पुढचे दोन ते तीन दिवस थंडी पडणार असल्याचेही हवामान विभागाने म्हटले आहे.
पुढच्या काही दिवसात मुंबईत देखील किमान तापमानाचा पारा घसरून थंडी वाढणार असल्याचेही हवामान विभागाने सांगितले आहे. या आठवड्यात मुंबईतील किमान तापमानाचा पारा १२ ते १३ अंश सेल्सिअसपर्यंत घसरण्याची शक्यता हवामान खात्याने दिली आहे. त्यामुळे पुढच्या आठवड्यात मुंबईत थंडी वाढणार आहे.