Patra Chawl Scam Case : विशेष न्यायालयातील सुनावणी २७ फेब्रुवारीपर्यंत लांबणीवर | पुढारी

Patra Chawl Scam Case : विशेष न्यायालयातील सुनावणी २७ फेब्रुवारीपर्यंत लांबणीवर

पुढारी ऑनलाईन डेस्क : मुंबईतील गोरेगाव पत्राचाळ घोटाळा प्रकरणात (Patra Chawl Scam Case)  आरोप निश्चित करण्यासाठी आज (दि.२४) मुंबईतील विशेष न्यायालयात सुनावणी होती. शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आणि प्रवीण राऊत सुनावणीसाठी पोहोचले होते. परंतु, तपास यंत्रणेने इतरांना समन्स अहवाल सादर न केल्यामुळे आजची सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे. या प्रकरणी आता पुढील सुनावणी २७ फेब्रुवारीला होणार आहे. शिवसेना खासदार संजय राऊत विशेष न्यायाधीश आर. एन. रोकडे यांच्यासमोर हजर झाले होते.

या प्रकरणात (Patra Chawl Scam Case) आरोप निश्चित करण्यापूर्वी प्रकरण सुनावणीसाठी घेण्यात आले होते. तथापि, या प्रकरणाचा तपास करत असलेल्या अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) इतर आरोपींना समन्स अहवाल सादर न केल्यामुळे कार्यवाही होऊ शकली नाही. त्यामुळे सुनावणी २७ फेब्रुवारीपर्यंत लांबणीवर टाकण्यात आली आहे.

गोरेगावमधील पत्राचाळच्या पुनर्विकासासंदर्भात आर्थिक अनियमितता झाल्याचे आढळून आले होते. या प्रकरणी ईडीने १ ऑगस्ट २०२२ रोजी संजय राऊत यांना अटक केली होती. दरम्यान, विशेष न्यायालयाने नोव्हेंबर २०२२ मध्ये त्यांना जामीन मंजूर केला होता. या प्रकरणात राऊत यांच्या पत्नी आणि सहकारी यांच्याशी संबंधित आर्थिक व्यवहारांशी संबंधित ईडीने चौकशी केली आहे.

गोरेगावमध्ये ४७ एकरमध्ये पसरलेले सिद्धार्थ नगर, पत्राचाळ म्हणून ओळखले जाते. येथे ६७२ भाडेकरू कुटुंबे राहतात. २००८ मध्ये महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरणाने (म्हाडा) चाळीच्या पुनर्विकासाचे कंत्राट गुरू आशिष कन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेड आणि हाऊसिंग डेव्हलपमेंट अँड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड या कंपनीला भागीदारीमध्ये दिले होते.

भाडेकरूंसाठी ६७२ फ्लॅट बांधायचे होते आणि काही फ्लॅट म्हाडालाही द्यायचे होते. तर, उर्वरित जमीन खासगी विकासकांना विकण्याची परवानगी दिली होती. परंतु कंपनीने पत्राचाळचा पुनर्विकास केला नसल्याने गेल्या १४ वर्षांत भाडेकरूंना एकही फ्लॅट मिळालेला नाही.

हेही वाचलंत का ? 

Back to top button