अटकपूर्व जामिनासाठी बांगलादेशी महिलेने बनविले बनावट भारतीय मतदान ओळखपत्र | पुढारी

अटकपूर्व जामिनासाठी बांगलादेशी महिलेने बनविले बनावट भारतीय मतदान ओळखपत्र

मुंबई : पुढारी वृत्तसेवा : दाखल झालेल्या गुन्ह्यात अटकपूर्व जामिन मिळवताना एका बांग्लादेशी महिलेने तिच्या साथिदाराच्या मदतीने बनविलेले बनावट भारतीय मतदान ओळखपत्र सादर केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. गुन्हा दाखल करुन कुरार पोलीस अधिक तपास करत आहेत.

अंधेरी लिंक रोड परिसरात रहात असलेल्या साहील (४५) यांनी याप्रकरणी सोनिया जबीन अहमद (३०) आणि करणकुमार राजकुमार उर्फ करणकुमार धीर (३४) यांच्याविरोधात कुरार पोलिसांत फिर्याद दिली आहे. ते ओशिवरा येथील एका व्यायामशाळेत व्यायाम करायला जात असताना त्यांची या दोघांशी ओळख झाली होती. या दोघांनीही साहील यांना ते पती-पत्नी असल्याचे सांगितले होते.
या दोघांनी साहील यांच्या दुकानातून प्रोटीन आणि काही खाद्यपदार्थ विकत घेतले. मात्र त्याचे झालेले ५२ हजार रुपये बिल दिले नाही. साहील यांनी पैशांची मागणी केली असता या दोघांनी सोशल मिडियाच्या माध्यमातून बदनामी केली. साहील यांनी २०१९ मध्ये सोनिया आणि करणकुमार विरोधात गोरेगाव पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला. दाखल झालेल्या गुन्ह्यात अटकपूर्व जामिन मिळण्यासाठी सोनिया आणि करणकुमार यांनी जून २०१९ मध्ये दिंडोशी सत्र न्यायालयात अर्ज केला. नोव्हेंबर महिन्यात न्यायालयाने दोघांनाही जामिन मंजूर केला.

सोनिया ही बांग्लादेशी असून तिने जामिन मिळविण्यासाठी भारतीय कागदपत्रे सादर केल्याची माहिती साहिल यांना मिळाली. त्यांनी न्यायालयाकडून माहिती मागविल्यांनी सोनिया हीने न्यायालयात सादर केलेल्या बनावट भारतीय मतदान ओळखपत्राची माहिती समोर आली. सोनिया ही बांग्लादेशी नागरीक असल्याची माहिती असताना तिला हे ओळखपत्र बनवण्यात मदत केल्याचा आरोप त्यांनी करणकुमारवर केला आहे.

Back to top button