मासिक पाळीवरून महिलांचा छळ दुर्दैवी! कुटुंब न्यायालयाची खंत : वडाळ्यातील महिलेला दिला दिलासा | पुढारी

मासिक पाळीवरून महिलांचा छळ दुर्दैवी! कुटुंब न्यायालयाची खंत : वडाळ्यातील महिलेला दिला दिलासा

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : आजच्या एकविसाव्या शतकातही महिलांचा वेशभूषा, मासिक पाळी यांसारख्या कारणांवरून छळ केला जात आहे हे अत्यंत दुर्दैवी आहे, असे महत्त्वपूर्ण मत वांद्रे कुटुंब न्यायालयाने एका प्रकरणात नोंदवले. पत्नीविरोधात गंभीर आरोप करून घटस्फोटाच्या दाव्यात कुटुंब न्यायालयाचे न्यायाधीश ए. एच. लद्धाड यांनी हे निरीक्षण नोंदवताना हा दावा फेटाळून लावत महिलेला मोठा दिलासा दिला.

वडाळा येथे राहणाऱ्या याचिकाकर्त्यांचे मार्च २०१५ मध्ये लग्न झाले; मात्र लग्न होऊन काही दिवस उलटत नाही तोच या दाम्पत्यामध्ये वाद सुरू झाला. लग्नाच्या चार महिन्यांनंतर पत्नीने घरातील कामांवरून वारंवार होणाऱ्या भांडणाला कंटाळून माहेरी निघून गेली. त्यानंतर सप्टेंबर २०१६ मध्ये पतीने घटस्फोटासाठी कौटुंबिक न्यायालयात याचिका दाखल केली. पत्नी संसारात सहकार्य करत नाही. कुटुंबासमोर अपमान करते, असे अनेक आरोप करून घटस्फोटाचा दावा दाखल केला.

त्यावर कुटुंब न्यायालयाचे न्यायाधीश ए. एच. लद्धाड यांच्यासमोर सुनावणी झाली. पतीच्या याचिकेवर महिलेने जोरदार आक्षेप घेताना अनेक आरोपांचा पाढाच न्यायालयासमोर वाचला. सासरच्या घरी फक्त साडी घालण्याची सक्ती करण्यात आली होती. पंजाबी ड्रेस किंवा नाईट ड्रेस यांसारखे इतर प्रकारचे कपडे घालण्यास परवानगी दिली जात नव्हती. तसेच मासिक पाळीच्या काळात माहेरी जाण्यास सांगितले. त्यावेळी माहेरी गेली नाही म्हणून घराच्या कोपऱ्यात बसण्यास भाग पाडले. तसेच घरातील कुठल्याही वस्तूला हात न लावण्याची व ओले कपडे घालण्याची जबरदस्ती करण्यात आल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. यांची न्यायालयाने गंभीर दखल घेतली.
आपण आज २१व्या शतकात आहोत. मात्र अजूनही महिलांचा मासिक पाळी आणि त्यांची वेशभूषा अशा विविध मद्द्यांवर छळ केला जात आहे. पुरुष मंडळी आजच्या जमान्यातही महिलांच्या पेहरावावर आपले नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करीत आहेत. महिलांच्या स्वातंत्र्यावर तसेच त्यांच्या स्वतःच्या आवडी निवडीवर आपली हुकुमत गाजविण्याचा प्रयत्न पुरुष करताहेत, हे अत्यंत दुर्दैवी आहे, असे निरीक्षण न्यायाधीश यांनी नोंदवित घटस्फोटाचा दावा फेटाळून लावला.

Back to top button