दरवर्षी खड्ड्यात जाणारा मुंबईकरांचा पैसा वाचवणार : मुख्यमंत्री शिंदे | पुढारी

दरवर्षी खड्ड्यात जाणारा मुंबईकरांचा पैसा वाचवणार : मुख्यमंत्री शिंदे

मुंबई; पुढारी वृत्तसेवा :  केंद्रात तसेच महाराष्ट्रातही आता आपलेच सरकार आहे. लवकरच मुंबई महापालिकेची निवडणूक होणार असून, विकासाचे हे डबल इंजिन ट्रिपल इंजिन होईल, पुढच्या तीन वर्षांत मुंबईचा पूर्ण कायापालट करण्याचा निर्धार आम्ही केला आहे, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधान नरेेंद्र मोदी यांच्या साक्षीने केली.

‘बीकेसी’ मैदानावरील सभेत मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत. केवळ सहा महिन्यांत या सरकारने इतके करून दाखविल्याने अनेकांच्या पोटात दुखायला लागले आहे. पायाखालची वाळू सरकली आहे. आमच्यावर टीका सुरू केली आहे. मात्र, जितकी टीका कराल त्याच्या दहा पट काम करून या टीकेला आम्ही प्रत्युत्तर देऊ.

उद्धव ठाकरेंना टोला

आजच्या दिवसाची सुवर्ण अक्षरात नोंद करावी लागेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याच हस्ते ऑक्टोबर 2015 मध्ये मेट्रोचे भूमिपूजन झाले होते. आज त्यांच्याच हस्ते उद्घाटनही होत आहे. मोदींच्या हस्ते मेट्रोचे उद्घाटन होऊ नये, अशी काही लोकांची इच्छा होती; पण नियतीच्या पुढे काही चालत नाही, असा टोला शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना नाव न घेता लगावला.

महाविकास आघाडी सरकारच्या काळात महाराष्ट्राचा विकास ठप्प झाला होता, लोकोपयोगी योजनांचा श्वास गुदमरला होता. त्यातून या राज्याची आणि जनतेची सुटका करण्याचे भाग्य मला मिळाले ते नरेंद्र मोदी यांच्यासारख्या धाडसी नेत्यामुळेच, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. बाळासाहेब ठाकरे आणि पंतप्रधान मोदी यांचे जिव्हाळ्याचे नाते होते. हिंदुत्व आणि हिंदुत्वाचा अभिमान, हा या दोघांच्याही विचारांचा समान धागा होता आणि विकासाचे राजकारण हा पाया होता. तेच सूत्र धरून अत्यंत महत्त्वाकांक्षी अशा प्रकल्पांचे भूमिपूजन करण्यासाठी आम्ही पंतप्रधानांना मुंबईत आमंत्रित केले आहे, असेही शिंदे म्हणाले.

महाराष्ट्राच्या समृद्धीची सुरुवात

गेल्यावर्षीच्या डिसेंबरमध्ये देशातल्या गेमचेंजर समृद्धी महामार्गाची सुरुवात झाली. महाराष्ट्राची भाग्यरेषा असलेल्या समृद्धी महामार्गामुळे राज्यात समृद्धी येईल, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. समृद्धी असो, मेट्रो असो किंवा येत्या नोव्हेंबरपासून सुरू होणारा समुद्रावरचा सर्वात लांब मुंबई ट्रान्स हार्बर लिंक प्रकल्प असो. आम्ही रस्ते, रेल्वे, सागरी मार्ग उभारून देशातला एक आदर्श असा वाहतूक आणि दळणवळण आराखडा जगासमोर ठेवत आहोत, असे ते म्हणाले.

मुंबईकर मुंबईच्या बाहेर जाऊ नये याला आमचे प्राधान्य आहे. सर्वसामान्य मुंबईकर माणसाला स्वस्तात घरे मिळाली पाहिजेत, यासाठी घरांच्या विविध योजना आम्ही राबवतो आहोत. आम्ही बाहेर गेलेल्या मुंबईकरांना पुन्हा मुंबईत आणू, असा विश्वासही मुख्यमंत्री शिंदे यांनी व्यक्त केला.

टक्केवारीसाठी विकासकामे रखडवली; फडणवीस यांचे उद्धव ठाकरे यांच्यावर टीकास्त्र

या सभेची सुरुवात करताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडले. ते म्हणाले, टक्केवारीपोटी मुंबईतील विकासकामे रखडवली गेली. मुंबईचा मलनिस्सारण प्रकल्प आपण केंद्राकडून परवानगी आणूनही काही वर्षे रखडविण्यात आला. टक्केवारी मिळत नसल्यामुळे हा प्रकल्प राबविण्यात आला नाही. परंतु, आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या प्रकल्पाचे उद्घाटन होत आहे. मुंबईमध्ये सहा हजार कोटी खर्च करून सिमेंट-काँक्रिटचे रस्ते होत आहेत; पण टक्केवारी घेणार्‍यांनी हे रस्ते कशाला, असा प्रश्न उपस्थित केला. मुंबईवर राज्य करून त्यांनी स्वतःची घरे भरली. या सिमेंट-काँक्रिटच्या रस्त्यांमुळे पुढची 40 वर्षे रस्ते खराब होणार नाहीत, असे फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांना नाव न घेता सुनावले.

Back to top button