Stock Market Updates : जागतिक आर्थिक मंदीमुळे गुंतवणूकदार धास्तावले आहेत. यामुळे भारतीय शेअर बाजारातील दोन्ही निर्देशांक गुरुवारी (दि.१९) घसरले. एकूणच दोन दिवसांच्या तेजीला आज ब्रेक लागला. सुरुवातीच्या व्यवहारात बीएसई सेन्सेक्सने २८४ अंकांनी खाली येऊन ६०,७०० वर तर निफ्टीने १८ हजारांवर व्यवहार केला. त्यानंतर सेन्सेक्स १८७ अंकांच्या घसरणीसह ६०,८५८ वर बंद झाला. तर निफ्टी १८,१०७ वर स्थिरावला.आजच्या व्यवहारात बँकिंग, फायनान्सियल शेअर्समध्ये सर्वाधिक नुकसान दिसून आले. तर आयटी शेअर्समध्ये तेजी दिसून आली.
अदानी एंटरप्रायजेस, हिंदाल्को, हिंदुस्थान युनिलिव्हर, इंडसइंड बँक, टाटा मोटर्स, टायटन, अदानी पोर्ट्स आणि आयशर मोटर्स यांचे शेअर्स घसरले. बहुतांश क्षेत्रीय निर्देशांकांनी आज लाल रंगात व्यवहार केला. बँक निफ्टी ०.१५ टक्के, निफ्टी ऑटो ०.२७ टक्क्याने घसरला. केवळ आयटी निर्देशांकांने आज हिरव्या रंगात व्यवहार केला. पर्सिस्टंट सिस्टम्स लि., कोफोर्ज लि., टाटा एलेक्सी लिमिटेड, MphasiS, इन्फोसिस, टेक महिंद्रा हे आयटी शेअर्स तेजीत राहिले.
एशियन पेंट्सचा एकत्रित निव्वळ नफा डिसेंबर तिमाहीत ५.६ वाढून १,०७३ कोटी झाला आहे, तर महसूल १.३ टक्के वाढून ८,६३६ कोटी रुपये झाला आहे. या पार्श्वभूमीवर एशियन पेंट्सचे शेअर्स वधारल्याचे दिसून आले.
दिग्गज गुंतवणूकदार राधाकिशन दमानी यांच्या डी-मार्ट शेअर्समध्ये गेल्या १६ महिन्यांपासून घसरण होत आहे. १८ ऑक्टोबर २०२१ रोजी ५,८९९ रुपयांवर जाऊन उच्चांक गाठणारा DMart शेअर आज ३,६०६ रुपयांवर आला आहे. या कालावधीत या शेअर्सचे ३९ टक्के म्हणजेच २,२९३ रुपयांचे नुकसान झाले आहे. गेल्या दोन वर्षांत वाढलेली महागाई आणि वाढती स्पर्धा यामुळे हा शेअर कमकुवत झाला असल्याचे बाजारातील विश्लेषकांनी म्हणणे आहे. सध्याच्या ट्रेडिंग सत्रात DMart शेअरने बीएसईवर ३,६५०.३५ रुपयांच्या मागील बंदच्या तुलनेत १.५९ टक्के घसरून ३५९२ रुपयांवर व्यवहार केला.
अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हच्या अधिकार्यांकडून व्याजदरवाढीबाबत होत असलेली वक्तव्ये, कमकुवत आर्थिक डेटा, आर्थिक मंदीची धास्ती यामुळे अमेरिकेतील शेअर बाजारात घसरण झाली आहे. S&P 500 आणि Dow Jones Industrial Average हे निर्देशांक सुमारे २ टक्क्याने घसरले आहेत. एका महिन्याहून अधिक काळातील ही सर्वात मोठी घसरण आहे. आर्थिक मंदीची धास्ती गुंतवणूकदारांनी घेतली आहे. याचे पडसाद शेअर बाजारात उमटत आहेत. डाऊ जोन्स निर्देशांक ६१३ अंकांनी घसरून ३३,२९६ वर आणि S&P 500 हा निर्देशांक ६२ अंकांनी घसरून ३,९२८ वर आला. तर नॅस्डॅक कंपोझिट १३८ अंकांनी घसरून १०,९५७ वर आला.
अमेरिकेतील घसरणीचा मागोवा घेत व्यवहार सुरु केलेल्या आशियाई बाजारांनाही तेजी मिळवण्यासाठी संघर्ष करावा लागला. (Stock Market Updates) जपानचा निक्केई निर्देशांक गुरुवारी दोन आठवड्यांच्या निचांकी पातळीवर आला. निक्केई १.४४ टक्क्यांनी खाली येऊन २६,४६८ वर बंद झाला. टॉपिक्स निर्देशांक गुरुवारी १ टक्के घसरून १९१५.६२ वर आला. दरम्यान, आशिया आणि अमेरिकेतील घसरणीनंतर युरोपियन शेअर्सही खाली आले. लंडनचा निर्देशांक FTSE 100 निर्देशांक ०.४ टक्क्यांनी घसरून ७,८०० अंकांवर आला. फ्रँकफर्टचा DAX निर्देशांक ०.५ टक्क्यांनी घसरून १५,११२.२५ अंकांवर आणि फ्रान्स शेअर बाजारातील पॅरिस सीएसी ४० निर्देशांक ०.५ टक्क्यांनी घसरून ७,०४८.५६ वर आला.
एनएसई डेटानुसार, परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी (FII) बुधवारी ३१९.२३ कोटी रुपयांचे शेअर्स विकले. तर देशांतर्गत गुंतवणूकदारांनी (DII) १,२२५ कोटी रुपयांचे शेअर्स खरेदी केले. चालू महिन्यात १८ जानेवारीपर्यंत FII ने १८,२७७.८४ कोटी रुपयांचे शेअर्स विकले तर DII ने १४,८०१.३९ कोटी रुपयांचे शेअर्स खरेदी केले. डिसेंबर महिन्यात, FII ने १४,२३१.०९ कोटी रुपयांच्या शेअर्सची विक्री केली तर DII ने २४,१५९.१३ कोटी रुपयांचे शेअर्स खरेदी केले.
हे ही वाचा :