Inflation risk : घरांचे वाढते दर, भाडेवाढीमुळे महागाई वाढण्याचा धोका

मुंबई : मोठ्या शहरांमधील घरांच्या वाढत्या किमती आणि वाढती घरभाडी (Inflation risk) या बाबी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियापुढील महागाईविरुद्धच्या लढाईतील मोठी आव्हाने ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. प्रमुख ग्राहकोपयोगी वस्तूंच्या किमती वरच्या स्तरावर गेल्या असताना या नव्या संकटाची भर पडण्याची भीती आता निर्माण झाली आहे
देशाच्या ग्राहक किंमत चलनवाढीत घरांचे भाडे. आणि अनुषंगिक खर्चाचे प्रमाण १०.०७ टक्के आहे आणि सध्या ते तीन वर्षांच्या उच्चांकाच्या जवळपास येते. त्यामुळे रिझर्व्ह बँकेसाठी हा भाग नवीन चिंतेचे कारण बनला आहे. गेल्या वर्षातील बराच कालावधी अन्नधान्याच्या वाढत्या किमतींच्या आघाडीवर रिझर्व्ह बँकेला सामना करावा लागला. एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार गृहनिर्माण क्षेत्रातील महागाई एक संकट झाले असून त्याच्या संभाव्य परिणामांकडे सध्या बँक बारकाईने लक्ष घालत आहे. शहरी गृहनिर्माण महागाई दर डिसेंबर २०२२ मध्ये वार्षिक आधारावर ४.४७ टक्क्यांपर्यंत वाढला. एका वर्षापूर्वी याच कालावधीत तो ३.६१ टक्के आणि डिसेंबर २०२० मध्ये ३.२१ टक्के होता, असे सांख्यिकी व कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार स्पष्ट झाले आहे. नोव्हेंबर आणि डिसेंबरमध्ये निर्देशांक ऑक्टोबरमधील ४.५८ टक्क्यांवरून किंचित कमी झाला असला, तरी तो २०१९ नंतरच्या सर्वोच्च पातळीच्या जवळ आहे.
भारताची किरकोळ चलनवाढ डिसेंबरमध्ये ५.७२ टक्क्यांपर्यंत घसरली. गेल्या वर्षीच्या पहिल्या १० महिन्यांत वरच्या टोकाच्या वर राहिल्यानंतर सलग दुसऱ्या महिन्यात ती रिझर्व्ह बँकेच्या २ ते ६ टक्के या कम्फर्ट झोनमध्ये होती. तथापि, मुख्य महागाई दर (ज्यामध्ये अन्न आणि इंधनाच्या किमती वगळल्या जातात) ६ टक्क्यांच्या जवळपास राहिला आहे. बँक ऑफ बडोदाच्या अर्थतज्ज्ञ अदिती गुप्ता म्हणाल्या, मुख्य चलनवाढीची स्थिती अद्यापही बिकट आहे. त्यामुळे घरांच्या किमतीत वाढ झाल्यामुळे एकूण चलनवाढीच्या संबंधात धोका निर्माण झाला आहे.
हेही वाचा :