नुस्ली वाडिया हत्या कट प्रकरण : मुकेश अंबानींना साक्षीदार म्हणून बोलावण्यास विशेष न्यायालयाचा नकार | पुढारी

नुस्ली वाडिया हत्या कट प्रकरण : मुकेश अंबानींना साक्षीदार म्हणून बोलावण्यास विशेष न्यायालयाचा नकार

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : १९८९ मध्ये उद्योगपती नुस्ली वाडिया यांच्या हत्येचा कट रचल्याप्रकरणी रिलायन्स इंडस्ट्रीजचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी यांना साक्षीदार म्हणून बोलावण्यात यावे, अशी विनंती करणारा अर्ज विशेष सीबीआय न्यायालयाने फेटाळून लावला. विशेष सीबीआय न्यायाधीश एस. पी. नाईक निंबाळकर सरकारी पक्षाने साक्षीदार म्हणून कोणाला बोलवावे हे सांगण्याचा अधिकार आरोपीला नाही, असे अर्ज फेटाळताना स्पष्ट केले.

नुस्ली वाडिया यांच्या हत्येच्या प्रयत्नाच्या खटल्यात रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे माजी वरिष्ठ कार्यकारी कीर्ती अंबानी हे मुख्य आरोपी आहेत. मात्र त्यांचा मृत्यू झाला आहे. व्यावसायिक वैमनस्यातून बॉम्बे डाईंगचे माजी चेअरमन नुस्ली वाडिया यांच्या हत्येचा कट रचल्याबद्दल कीर्ती अंबानी व इतरांविरुद्ध ३१ जुलै १९८९ रोजी एफआयआर नोंदवण्यात आला होता. राज्य सरकारने २ ऑगस्ट १९८९ रोजी या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे हस्तांतरित केला होता.

मात्र २००३ मध्ये या प्रकरणाचा खटला विशेष सीबीआय न्यायाधीश एस. पी. नाईक निंबाळकर यांच्या समोर सुरू झाला. यावेळी ३३ वर्षांपूर्वीच्या खटल्यातील आरोपीं इवान सिक्वेराने अर्ज करून रिलायन्स इंडस्ट्रीजचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी यांना साक्षीदारबनविण्याची विनंती केली होती. सीबीआयने तीव्र विरोध केला होता.

Back to top button