भाजपविरुद्ध महाविकास आघाडी थेट लढत | पुढारी

भाजपविरुद्ध महाविकास आघाडी थेट लढत

मुंबई, पुढारी वृत्तसेवा :  येत्या ३० जानेवारीला होणाऱ्या विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या सोमवारच्या शेवटच्या दिवशी पाचही मतदारसंघांत मिळून २७ उमेदवारांनी माघार घेतली. कोकण शिक्षक मतदारसंघात भाजप विरुद्ध महाविकास आघाडी अशी थेट लढत असून, उर्वरित चार मतदारसंघांत तिरंगी, चौरंगी लढत होणार आहेत. मात्र, खरी लढत भाजप विरुद्ध महाविकास आघाडी अशीच आहे.

काँग्रेस नेते सत्यजित तांबे यांच्या अपक्ष उमेदवारीमुळे चर्चेत आलेल्या नाशिक पदवीधर मतदारसंघाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले होते. येथे सहा उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले आहे. मात्र, तांबे यांच्यासह १६ उमेदवार रिंगणात आहेत. त्यामध्ये शुभांगी पाटील आणि अॅड. सुभाष जंगले यांचाही समावेश आहे. कोकण शिक्षक मतदारसंघात ८, औरंगाबाद शिक्षक मतदारसंघात १४, नागपूर शिक्षकमध्ये २२, नाशिक १६ तर अमरावती पदवीधर मतदारसंघात एकूण २३ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.

विधान परिषद निवडणुकीत भाजपच्या विरोधात एकजूट करून एकास एक उमेदवार देण्याचे महाविकास आघाडीचे प्रयत्न होते. मात्र, औरंगाबाद शिक्षक मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार विक्रम काळे यांच्या विरोधात राष्ट्रवादीच्या प्रदीप सोळंके यांनी बंडखोरी केली आहे. सोळंके यांनी माघार न घेतल्याने राष्ट्रवादीने त्यांची हकालपट्टीची केली आहे. नागपूर शिक्षक मतदारसंघात राष्ट्रवादीच्या ओबीसी सेलचे सतीश इटकेलवार यांनी बंडखोरी करीत आघाडीच्या उमेदवाराला आव्हान दिल्याने राष्ट्रवादीला इटकेलवार यांच्यावरही कारवाई करावी लागली.

दरम्यान, कोकण पदवीधर मतदारसंघात भाजप प्रणित शिक्षक परिषदेचे वेनुणाथ कडू यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता. सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत कडू यांनी उमेदवारी मागे घेण्याची घोषणा केली कोकण शिक्षकरमधून ज्ञानेश्वर म्हात्रे (भाजप), बाळाराम पाटील (अपक्ष), धनाजी नानासाहेब पाटील (जदयू) औरंगाबादेत विक्रम काळे (राष्ट्रवादी काँग्रेस), किरण पाटील (भाजप), कालिदास माने ( वंचित बहुजन आघाडी), प्रदीप सोळंके (अपक्ष) अशी लढत आहे.

Back to top button