

मुंबई : पुढारी वृत्तसेवा मुंबईतील राष्ट्रीय वस्त्रोद्योग महामंडळच्या (एनटीसी) नऊ गिरण्यांच्या जमिनींवर असणाऱ्या ११ चाळींच्या पुनर्विकासाचा मार्ग खुला झाला आहे. म्हाडामार्फत राज्य सरकार या चाळींचा पुनर्विकास करणार असल्याची घोषणा केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी केली.
मुंबईत एनटीसीच्या एकूण ११ गिरण्या असून या गिरण्यांच्या जागांवर असणाऱ्या चाळींची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. मुंबई महापालिकेने या चाळींना धोकादायक जाहीर केले आहे, पण यांच्या पुनर्विकासाचे कोणतेही धोरण नसल्याने पुनर्विकास रखडला होता. मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार आशिष शेलार यांनी याबाबत केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्रालयाशी संपर्क करून या चाळींचा पुनर्विकास व्हावा यासाठी पाठपुरावा केला होता. या चाळींचा पुनर्विकास ३३ (७) होणे अपेक्षित होते; मात्र जमीन केंद्र सरकारच्या मालकीची असलेल्याने केंद्र सरकारने त्याबाबत राज्य शासनला परवानगी देणे आवश्यक होते… या चाळींपैकी काही चाळींची जागा मिलमध्येच होती. त्यामुळे त्यांची सीमा निश्चित करणे आवश्यक होते, तर यातील काही चाळी या उपकर प्राप्त नाहीत.
पीयूष गोयल यांनी रविवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करून या चाळींच्या पुनर्विकासाची योजना तयार करून सादर करा, केंद्र सरकार त्याला मंजुरी देईल, असे सांगितले. या चाळींमध्ये सुमारे १ हजार ८९२ कुटुंबे राहात आहेत.