६०% रस्ते अपघात अतिवेगामुळे! २०२१ च्या तुलनेत २०२२ मध्ये अपघात आणि मृत्यू वाढले | पुढारी

६०% रस्ते अपघात अतिवेगामुळे! २०२१ च्या तुलनेत २०२२ मध्ये अपघात आणि मृत्यू वाढले

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : राज्यातील एकूण रस्ते अपघातांपैकी ६० टक्के अपघात हे अति वेगाने वाहन चालविल्यामुळे झाले आहेत. २०२१ च्या तुलनेत २०२२ मध्ये अपघातांच्या संख्येत वाढ झाली आहे. गेल्या दोन वर्षांत राज्यात ५९, ५९७ रस्ते अपघात झाले असून त्यात २७,०८४ जणांचा मृत्यू झाला.

अपघातांमध्ये महाराष्ट्र राज्याचा तिसरा क्रमांक लागतो. दरवर्षीप्रमाणे या जानेवारी महिन्यात सात दिवसांची राज्य रस्ते सुरक्षा मोहीम सुरू असतानाही अपघातांचे प्रमाण काही केल्या कमी होताना दिसत नाही.

राज्यात २०२१ आणि जानेवारी ते नोव्हेंबर २०२२ या काळात रस्ते अपघातांमध्ये ४७ हजार ७९३ जण जखमी झाले आहेत. २०२१ मध्ये २९ हजार ४७७ अपघात झाले होते. त्यात १३ हजार ५२८ जणांचा मृत्यू झाला होता. तर २०२२ मध्ये अपघातांचे प्रमाण वाढले आहे. जानेवारी ते नोव्हेंबर या अकरा महिन्यांत झालेल्या एकूण ३० हजार १२० अपघातांमध्ये १३ हजार ५५६ जणांनी आपला जीव गमावला आहे. २०२१ मध्ये जखमी प्रवाशांची संख्या २३ हजार ७१ होती. २०२२ मध्ये हीच संख्या २४ हजार ७२२ झाली आहे.

राज्यात १ हजार ब्लॅक स्पॉट्स

राज्यात एक हजार ४ ब्लॅक स्पॉट्स (अपघातप्रवण क्षेत्र) आहेत. पहिल्या पाच जिल्ह्यात मुंबई आणि नवी मुंबईचा समावेश आहे. नवी मुंबईत ५२, तर मुंबईत ४८ ब्लॅक स्पॉट्स आहेत.

सुसाट प्रवास जीवघेणा

  • मुंबई ते गोवा राष्ट्रीय महामार्गावर जानेवारी ते नोव्हेंबर २०२२ या कालावधीत रस्ते अपघातात १५० जणांनी आपले प्राण गमावले आहेत. २०२१ मध्ये ११८ अपघातात ११९ जणांचा मृत्यू झाला होता.
  • ११ डिसेंबरपासून सुरू झालेल्या समृद्धी महामार्गावरही आतापर्यंत ५० अपघात झाले आहेत. त्यापैकी तीन अपघातांमध्ये चार जणांचा मृत्यू झाला आहे, तर २१ किरकोळ अपघातांमध्ये २९ जखमी झाले आहेत.
  • मुंबई-पुणे जुना महामार्ग आणि मुंबई-पुणे एक्स्प्रेस-वेवर २०२१ आणि २०२२ मध्ये एकूण ८७७ रस्ते अपघात झाले असून त्यात ४०७ जणांचा मृत्यू, तर ५६० जण जखमी झाले.

अपघाताची कारणे

वेग जास्त ठेवणे.
बेदरकारपणे गाड्या चालविणे.
सीटबेल्टचा वापर न करणे.
संरक्षक भिंतीवर आदळणे.

Back to top button