कोरोना रुग्णांच्या मृत्यूची आकडेवारी चीन लपवतोय; जागतिक आरोग्य संघटनेचा आरोप | पुढारी

कोरोना रुग्णांच्या मृत्यूची आकडेवारी चीन लपवतोय; जागतिक आरोग्य संघटनेचा आरोप

बीजिंग; वृत्तसंस्था :  चीनने कोरोना रुग्णांच्या मृत्यूसंबंधीची आकडेवारी लपवल्याचा गंभीर आरोप जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक टेड्रोस गेब्रेयसस यांनी केला आहे. यामुळे जगभरात होणार्‍या कोरोना रुग्णांच्या मृत्यूची संख्या स्पष्ट नसल्याचेही ‘डब्ल्यूएचओ’कडून सांगण्यात आले आहे. पत्रकार परिषदेत त्यांनी याबाबत माहिती दिली.

गेल्या आठवड्यात जागतिक आरोग्य संघटनेकडे 11 हजार 500 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यापैकी 40 टक्के रुग्ण अमेरिका, 30 टक्के रुग्ण युरोप आणि उर्वरित 30 टक्के रुग्ण पश्चिम पॅसिफिक प्रदेशातील आहेत. चीनने कोरोना रुग्णांच्या मृत्यूची संख्या कमी नोंदवल्याने जगभरात झालेल्या कोरोना रुग्णांच्या मृत्यूचा आकडा स्पष्ट नाही, अशी माहिती गेब्रेयसस यांनी दिली आहे. सर्वच देशांना त्यांनी कोरोना रुग्णांच्या मृत्यूची योग्य आकडेवारी जाहीर करण्याचे आवाहन केले.

ते म्हणाले की, कोरोनाच्या नवीन व्हेरियंटविरोधात लढण्यासाठी सर्वच देशांनी कोरोना रुग्णांच्या मृत्यूची योग्य आकडेवारी सार्वजनिक करणे आवश्यक आहे. कोरोनाच्या नवीन व्हेरियंटचा प्रसार रोखण्यासाठी सिक्वेन्सिंग ही एक महत्त्वाची प्रक्रिया आहे. आम्ही सर्वच देशांना सिक्वेन्सिंग वाढवण्याचे आवाहन केले आहे. यामुळे कोरोना रुग्णांची अचूक माहिती पुढे येणास मदत होईल.

Back to top button