शेंडा पार्क जागेचा वापर करा : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे | पुढारी

शेंडा पार्क जागेचा वापर करा : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई, पुढारी वृत्तसेवा : कृषी आणि आरोग्य विभागाला आवश्यक असणारी जागा वगळून शेंडा पार्कमधील इतर जागेचा शासकीय कार्यालये आणि इतर प्रयोजनांसाठी उपयोग केला जाईल. त्याची कार्यवाही सुरू करा, असे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी दिले.

सह्याद्री अतिथीगृहावर शेंडा पार्क येथील जमीन क्रीडा संकुल, आयटी पार्कसह अन्य विविध प्रयोजनांसाठी उपयोगात आणण्यासंदर्भात बैठक झाली. मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, शेंडा पार्क येथील जागा जिल्हा क्रीडा संकुल, जिल्हा ग्रंथालय, हवामानशास्त्र प्रयोगशाळा, सार्वजनिक आरोग्य प्रयोगशाळा, प्रस्तावित जिल्हाधिकारी कार्यालय, वखार महामंडळ गोडावून आणि कार्यालय, समाजकल्याण वसतिगृह, करवीर पोलिस ठाणे, प्रस्तावित नवीन मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, प्री-एनडीए अकादमी, आयटी पार्क आदी प्रयोजनांसाठी आवश्यक आहे.

ज्या विभागांना या ठिकाणी जागा हवी आहे, त्यांच्याकडून उपलब्ध असलेली जागा उपयोगात आणण्याबाबत अभिप्राय घेऊन कार्यवाही करावी.

कृषी आणि आरोग्य विभागाला त्यांच्या विविध प्रयोजनांसाठी आवश्यक असलेली जागावगळता इतर जागा या इतर प्रयोजनासाठी उपयोगात आणण्यासंदर्भात कार्यवाही करा, असेही मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.

या बैठकीला शालेय शिक्षणमंत्री तथा कोल्हापूरचे पालकमंत्री दीपक केसरकर, कृषिमंत्री अब्दुल सत्तार, सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत, अन्न व औषध प्रशासनमंत्री संजय राठोड, आमदार प्रकाश आबिटकर, खासदार धैर्यशील माने, मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, महसूल विभागाचे अप्पर मुख्य सचिव नितीन करीर, कृषी विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले, प्रभारी जिल्हाधिकारी संजय शिंदे यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

Back to top button