मंत्रिमंडळ विस्तार होणार, पण 2024 ला; बच्चू कडू यांचा उपरोधिक टोला | पुढारी

मंत्रिमंडळ विस्तार होणार, पण 2024 ला; बच्चू कडू यांचा उपरोधिक टोला

मुंबई;  पुढारी वृत्तसेवा :  प्रहार जनशक्ती संघटनेचे आमदार बच्चू कडू यांनी मंत्रिमंडळ विस्तारावरून पुन्हा एकदा शिंदे-फडणवीस सरकारला टोला लगावला आहे. मंत्रिमंडळाचा विस्तार होणार हे नक्की आहे. त्याची तारीखही मला माहीत आहे. पुढचा विस्तार 2024 साली नक्की होईल, अशा उपरोधिक शब्दांत कडू यांनी सोमवारी आपल्याच सरकारला सुनावले.

राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार सध्या चर्चेचा मुद्दा बनला आहे. रखडलेल्या विस्तारावरून विरोधकांच्या टीकेनंतर आता सत्ताधारी आमदारांकडूनही याबाबत उलटसुलट विधाने होत आहेत. शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा देणारे आमदार बच्चू कडू यांनी पुन्हा एकदा विस्ताराच्या चर्चेवरून सरकारला फटकारले.

विस्तार होत नसल्याने नाराज आहात का, असा प्रश्न विचारला असता, दिव्यांगांसाठी स्वतंत्र मंत्रालयाची माझी मागणी मान्य झाली आहे. त्यामुळे नाराज असण्याचा विषयच येत नाही. मंत्रिमंडळ विस्तार का रखडला याचे उत्तर केवळ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच देऊ शकतील, असेही कडू यांनी सांगितले.

Back to top button