रुपाली चाकणकर म्हणजे महिला आयोग नव्हे : चित्रा वाघ (Chitra Wagh) | पुढारी

रुपाली चाकणकर म्हणजे महिला आयोग नव्हे : चित्रा वाघ (Chitra Wagh)

पुढारी ऑनलाईन डेस्क : भाजप नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh)  यांनी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या आरोपांना आज (दि. ७) पत्रकार परिषदेत प्रत्युत्तर दिले. रुपाली चाकणकर म्हणजे महिला आयोग नाही. त्या बाष्कळ विधाने करत आहेत. आता ती बंद केली पाहिजे. उर्फी जावेद प्रकरणात चाकणकर यांनी योग्य कारवाई केली नाही, असा आरोपही वाघ यांनी या वेळी केला.

वाघ (Chitra Wagh) म्हणाल्या की, माझा महिला आयोगावर आक्षेप नाही, परंतु आयोगाच्या अध्यक्षपदावर असणाऱ्या व्यक्तीच्या कार्यपद्धतीवर आक्षेप आहे. तेथे कशाप्रकारे काम केले जाते, याची माहिती माझ्याकडे आहे. उर्फी जावेद देहप्रदर्शन करत फिरत आहे. याबाबत आयोगाच्या अध्यक्षांनी योग्य ती दखल घेतली नाही. या प्रकऱणी मुंबई पोलिसांनी दखल घेतली नसल्याचे त्या सांगत आहेत. परंतु, त्या हे कशाच्या आधारावर सांगत आहेत. त्यांनी पोलिसांकडून अहवाल मागविला का? नोटीस सर्व सदस्यांच्या संमतीने पाठविली का ? असा सवाल त्यांनी यावेळी केला.

दरम्यान, चित्रा वाघ आणि अभिनेत्री उर्फी जावेद यांच्यातील वाद आता वाघ विरुद्ध महिला आयोगाच्या अध्यक्षा चाकणकर असा चिघळला आहे. महिला आयोगाने पाठविलेल्या नोटिशीबाबत चित्रा वाघ यांनी उपरोधिक टीका करत महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकरांची खिल्ली उडवली आहे. चित्रा वाघ यांनी खोचक ट्विट करत या नोटिशीने आपल्याला काही फरक पडत नसल्याचा अप्रत्यक्षरित्या टोला लगावला आहे.

चित्रा वाघ यांनी ट्विट केले होते की, “स्त्री सन्मानाचा सामाजिक विषय धार्मिक आणि पक्षीय राजकारणात पिसला जातोय याचे आज मनात शल्य आहे. राहिला विषय नोटीशीचा तर मला येणाऱ्या अशा ५६ नोटीशीत आणखी एकची भर..! असं खोचक ट्विट करत भाजप महिला प्रदेशाध्यक्ष नेत्या चित्रा वाघ यांनी महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्यावर उपरोधिक टीका केली होती.

हेही वाचलंत का ? 

Back to top button