निवडणुकांसाठी आयोग सज्ज; अंतिम मतदारयादी प्रसिद्ध | पुढारी

निवडणुकांसाठी आयोग सज्ज; अंतिम मतदारयादी प्रसिद्ध

मुंबई; पुढारी वृत्तसेवा :  आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मतदारांची अंतिम यादी तयार झाली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने त्याबाबतची घोषणा केली आहे. या यादीमध्ये राज्यातील युवा, दिव्यांग महिला, देहविक्री करणार्‍या महिला आणि तृतीयपंथीयांचा समावेश करण्यात आला आहे.

केंद्रीय निवडणूक आयोगामार्फत मतदान केंद्रांचे सुसूत्रीकरण व प्रमाणीकरण, दुबार नोंदणीच्या त्रुटी दूर करणे आणि सुधारित मतदारयादी तयार करण्यात आली होती. 9 नोव्हेंबर 2022 रोजी एकत्रित प्रारूप मतदारयादी प्रसिद्ध करण्यात आली होती. या प्रारूप मतदारयादीच्या प्रसिद्धीनंतर नागरिकांकडून दावे व हरकती स्वीकारण्यात आल्या होत्या. सर्व दावे आणि हरकती यांचा निकाल 26 डिसेंबर 2022 पर्यंत लावण्यात आला. त्यानंतर आयोगाने गुरुवारी अंतिम मतदारयादी प्रसिद्ध केली आहे, अशी माहिती राज्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी दिली.

युवा मतदार, दिव्यांग महिला, देहविक्री करणार्‍या महिला, तृतीयपंथीय व्यक्ती आणि विमुक्त भटक्या जमातीमधील पात्र व्यक्तींनी मोठ्या प्रमाणात नोंदणी करावी, याकरिता विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात आले होते.
केंद्रीय निवडणूक आयोगाने विशेषत: असुरक्षित आदिवासी गट प्रवर्गातील पात्र व्यक्तींचे शंभर टक्के नोंदणीकरण केले आहे. मतदारयादी नव्याने तयार केल्यानंतर पुरुष मतदारांत 1 लाख 52 हजार 254 इतकी वाढ झाली. महिलांच्या संख्येत 1 लाख 6 हजार 287 इतकी, तर 90 तृतीयपंथीय मतदार वाढल्याची माहिती देशपांडे यांनी दिली.

एकूण मतदार
9 कोटी 2 लाख 85 हजार 801
पुरुष
4 कोटी 71 लाख 35 हजार 999
महिला
4 कोटी 31 लाख 45 हजार 67
तृतीयपंथीय
4 हजार 735

Back to top button