प्रभाग रचनेवरून काँग्रेस विरुद्ध राज्य सरकार, मतभेद उघड

संग्रहित फोटो
संग्रहित फोटो
Published on
Updated on

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : महापालिका, नगरपालिका आणि नगर परिषदांच्या निवडणुका या बहुसदस्यीय पद्धतीने घेण्यासाठी काढण्यात येणार्‍या अध्यादेशाचा मसुदा राजभवनावर पोहोचला असतानाच काँग्रेसने या प्रभाग रचनेला उघड विरोध केला आहे. परिणामी, प्रभाग रचनेवरून सरकारमधील मतभेद उघड झाले असून, बहुसदस्यीयऐवजी दोनच सदस्यांचा प्रभाग करावा, अशी भूमिका काँग्रेसने घेतली आहे.

मुंबई वगळता अन्य महापालिकांसाठी बहुसदस्यीय प्रभाग रचना अंमलात आणण्याचा निर्णय बुधवारी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. आता या अध्यादेशाला राज्यपालांची मंजुरी मिळताच प्रभाग रचने चा मार्ग मोकळा होईल. मात्र, आता काँग्रेसने विरोधी भूमिका घेतल्याने हा अध्यादेश रोखला जातो का यावर स्थानिक निवडणुकांचे गणित अवलंबून आहे.

फेब्रुवारी, मार्च महिन्यात होणार्‍या 18 महापालिकांच्या निवडणुकांसाठी एकसदस्यीय पद्धतीने प्रभाग रचना सुरू करण्याचे आदेशही राज्य निवडणूक आयोगाने दिले होते. मात्र, बुधवारी मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय फिरविण्यात आला. महापालिका निवडणुकीसाठी तीन तर नगरपरिषद आणि नगरपालिकांसाठी दोन सदस्यीय पध्दत लागू करण्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले. हा निर्णय काँग्रेसला धोकादायक असल्याचे लक्षात आल्यानंतर काँग्रेसमध्ये अस्वस्थता पसरली आहे.

प्रदेश काँग्रेस कमिटीच्या नवनियुक्त पदाधिकार्‍यांची बैठक गुरुवारी प्रदेश काँग्रेसचे मुख्यालय टिळक भवन येथे झाली. या बैठकीत बहुसदस्यीय प्रभाग रचनेचे पडसाद उमटले. बहुसदस्यीयचा निर्णय बदलून तीन ऐवजी दोन सदस्यांचा प्रभाग करावा, असा ठराव यावेळी मंजूर करण्यात आला. आता हा ठराव घेऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे काँग्रेसची भूमिका मांडली जाईल, असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितले.

काँग्रेसला जड जाणार

मंत्रिमंडळ बैठकीत महापालिका निवडणुका या तीन सदस्यीय प्रभाग रचनेनुसार घेण्याचा प्रस्ताव मंजूर झाला खरा, पण हा प्रस्ताव काँग्रेससाठी घाट्याचा सौदा ठरणार आहे. 2017 मध्ये याच पद्धतीने झालेल्या 9 महापालिकांच्या निवडणुकीत काँगेस चौथ्या स्थानी फेकली गेली होती. या निवडणुकीत काँग्रेस 1 हजार 41 जागांपैकी फक्त 90 जागा जिंकू शकली होती. यावेळीही बहुसदस्यीय निवडणूक काँगेसला अडचणीची ठरणार आहे.

2017 साली ठाणे, पुणे, पिंपरी- चिंचवड, उल्हासनगर, सोलापूर, नाशिक, अकोला, अमरावती आणि नागपूर महापालिका निवडणूक ही चार सदस्यीय पद्धतीने घेण्यात आली. या निवडणुकीत भाजपला 7 महापालिका जिंकण्यात यश आले.

शिवसेना ठाणे महापालिकेच्या रूपाने आपला गड शाबूत राखू शकली. मात्र काँग्रेस-राष्ट्रवादीचा धुव्वा उडाला. काँग्रेस पार चौथ्या स्थानी फेकली गेली. आता महाविकास आघाडी सरकार असल्याने भाजपला हे यश मिळविणे अशक्य असले तरी काँग्रेससाठीही निवडणूक जास्त कठीण आहे.

आताही या महानगरांमध्ये काँग्रेसची स्थिती फारशी सुधारली नसल्याने आणि सर्वच ठिकाणी आघाडी होणे शक्य नसल्याने ही निवडणूक पध्दत काँग्रेस आणि त्यांच्या उमेदवारांसाठी आव्हान ठरणार आहे. त्यामुळे हा निर्णय बदलण्यासाठी काँग्रेसने प्रयत्न सुरू केले आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news