मुंबई; पुढारी वृत्तसेवा : अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम असलेल्या कथित संबंध असल्याचा आरोप केल्याने वादाच्या भोवऱ्यात अडकलेले शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांच्या अडचणी वाढल्या आहेत. कथित प्रेमप्रकरणात शेवाळे यांच्याविरोधात मोक्कांतर्गत कारवाई करण्याचे आदेश द्या. अशी मागणी करणाऱ्या तक्रारीची सत्र न्यायालयाचे प्रधान न्यायाधीश ए. सुब्रमण्यम यांनी गंभीर दखल घेतली. या प्रकरणात तातडीने सरकारी वकिलांची नियुक्ती करण्याचे आदेश राज्य सरकारला दिले.
राहुल शेवाळे यांचे ज्या महिलेशी प्रेमसंबंध आहेत, त्या महिलेचे दाऊद इब्राहिमशी संबंध असल्याची बाब शेवाळे यांनी का लपवली? याबाबत शेवाळे यांच्याविरुद्ध मोक्का कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून अटक करण्यात यावी, अशी मागणी मालाड पूर्व येथील माहिती अधिकार कार्यकर्ते प्रदीप भालेकर यांनी केली आहे. या तक्रार अर्जाची गंभीर दखल घेत राज्य सरकारला पुढील दोन दिवसांत लीगल एड मार्फत सरकारी वकिलांची नियुक्ती करण्याचे आदेश देत तक्रार अर्जावर तातडीच्या सुनावणीचे स्पष्ट न्यायालयाने संकेत दिले.